धरण क्षेत्रात मुसळधार: नीरा व कृष्णा खोऱ्यातील पाणीसाठ्यात वाढ

नीरा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ जुलै : फलटण तालुक्याला पिण्याचे आणि शेतीचे पाणी पुरवणाऱ्या नीरा व कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, नीरा खोऱ्यातील वीर धरण ९९.२९ टक्के भरले असून धरणातून नीरा नदीपात्रासह कालव्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू आहे.

नीरा खोऱ्यातील धरणांची ताजी स्थिती

वीर धरणात ९.३८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात ४,६१३ क्युसेक, डाव्या कालव्यात ८२७ क्युसेक आणि उजव्या कालव्यात १,५५० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.

भाटघर धरणात २१.३० टीएमसी म्हणजेच ९०.६४ टक्के उपयुक्त साठा झाला असून २४ तासांत २३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा देवघर धरणात ११.४३ टीएमसी (९७.४२ टक्के) साठा उपलब्ध असून पॉवर हाऊसद्वारे ७५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. तेथे ४६ मि.मी. पाऊस झाला आहे. गुंजवणी धरण ८८.३३ टक्के भरले असून ३.२६ टीएमसी साठा जमा झाला आहे.

धोम बलकवडी धरण ८७ टक्के भरले

कृष्णा खोऱ्यातील फलटणच्या दुष्काळी भागासाठी महत्त्वाच्या असलेल्या धोम बलकवडी धरणात ३.४८ टीएमसी म्हणजेच ८७.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात तब्बल ६८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जललक्ष्मी बोगद्याद्वारे ३३० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.

पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांतील आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Back to top button
Don`t copy text!