अवकाळी पावसाने फलटण शहर व तालुक्यात नुकसान; घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण शहर व तालुक्यात बुधवार, दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने नुकसान झाले असून काही नागरिकांचे घरांचे पत्रे उडाले, तसेच शेतकर्‍यांच्या चारा पिकांचे, ऊस, भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, मंडलाधिकारी विनायक गाडे यांनी केली आहे.

बुधवारी दिवसभर प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक हलका पाऊस सुरू झाला, या पावसाचा जोर रात्री वाढून सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळला. लोणंद ते तरडगावदरम्यान हा पाऊस झाला. त्यानंतर साखरवाडी, सुरवडी, खराडेवाडी, चौधरवाडी, खुंटे, शिंदेवाडी, भाडळी बु॥, गोखळी, गुणवरे, तरडगाव, सासवड, हिंगणगाव, कापडगाव, गिरवी, बिबी, आदर्की खु॥ या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.

सुरवडी येथील शेतकरी धनंजय साळुंखे पाटील यांच्या शेतातील आंबा बागेतील अनेक झाडावरील कैर्‍या, आंबे खाली पडल्याने तर काही झाडे पडल्याने नुकसान झाले आहे, तर सुरवडी येथील प्रकाश पवार यांच्या २० गुंठे क्षेत्रातील आणि श्रीमती यमुनाबाई सुदाम भुजबळ यांच्या २५ गुंठे क्षेत्रातील ढोबळी मिरचीचे नुकसान झाले आहे. या दोन्ही ठिकाणी बांबू व नेटच्या सहाय्याने या पिकासाठी तयार करण्यात आलेले कच्चे नेट हाऊस या पिकावर कोसळल्याने संपूर्ण पिकाचे सुमारे ३५ टक्के हून अधिक नुकसान झाले आहे.

प्रचंड वादळ वार्‍याने अनेक झाडे, विशेषतः आंब्याची झाडे पडल्याने, तर काही ठिकाणी आंब्याची फळे, कैर्‍या पडल्याने, वीजेचे खांब पडल्याने, तसेच उभा ऊस, मका, कडवळ यासारखी चारा पिके जमिनीवर आडवी झाली आहेत. भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता.

दरम्यान, आळंदी – पंढरपूर – मोहोळ राष्ट्रीय महामार्गापैकी लोणंद – तरडगाव मार्गावर मोठे वादळी वारे आणि पाऊस झाल्याने झाडे पडली होती.

कापडगाव लगतच्या रस्त्यावर विजेचा खांब पडल्याने आणि त्यावरील वीजवाहक तारांमध्ये वीज प्रवाह सुरू असल्याने भितीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. कापडगावचे माजी सरपंच प्रवीण खताळ, पोलिस पाटील नंदकुमार खताळ, स्वप्नील मलगुंडे आदींनी वीज वितरण कंपनीच्या या भागातील वायरमन यांच्याशी संपर्क करून त्यांना त्याबाबत माहिती देवून वीजपुरवठा खंडीत करून घेतला आणि तुटलेल्या वीजवाहक तारा कट करून पडलेला खांब बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

वादळी वार्‍यामुळे बापूराव करे, मुरूम यांच्या राहत्या घराचे पत्रे उडाल्याने त्यांच्या घरातील कपडे, भांडी, धान्य, संसारोपयोगी साहित्य उघड्यावर पडले, यात कुटुंबातील एक दोघांना किरकोळ दुखापत झाली. ही माहिती मिळताच रात्री ११ वाजता तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, महसूल मंडलाधिकारी विनायक गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, करे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. जखमींना लोणंद येथील रुग्णालयात पाठवून उपचार करून घेतले. तात्काळ पंचनामा करून या कुटुंबाला शासकीय मदत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!