‘अक्वान’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचे हवामान बदलले; राज्यातील थंडीचा जोर ओसरला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

‘अक्वान’ चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे आणि चक्राकार वाऱ्यांमुळे उत्तरेकडील थंड वारे अडकल्याने राज्यातील थंडीचा जोर कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २३ नोव्हेंबर : दिवाळीनंतर राज्यात हुडहुडी भरवणारी थंडी सुरू झाली होती, मात्र बंगालच्या उपसागरातील ‘अक्वान’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे अडखळले आहेत. परिणामी राज्यातील गारठा काहीसा ओसरला असून कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवली जात आहे. दुसरीकडे, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून राज्यात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

उत्तरेकडील थंड वारे अडकल्याने तापमानात वाढ

‘अक्वान’ चक्रीवादळाचे अवशेष असलेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर छत्तीसगड आणि परिसरावर सक्रिय आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात परिसरात समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात अंशतः ढगाळ हवामान तयार झाले असून कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

प्रमुख शहरांतील किमान आणि कमाल तापमानाची नोंद

उत्तर मध्य महाराष्ट्रात काहीसा गारठा कायम असताना उर्वरित भागात पारा चढला आहे. मागील चोवीस तासांत जळगाव येथे राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस, धुळे येथे १०.४ अंश, तर निफाड येथे १०.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. नाशिक आणि सातारा येथे १३ अंशांपेक्षा कमी, तर पुणे येथे १४ अंशांपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले. कमाल तापमानाचा विचार करता सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.१ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी आणि सांताक्रूझ येथे ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!