
कमिशनचे आमिष दाखवून बँक खाती आणि एटीएम कार्ड गोळा करून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चौघांच्या टोळीला सायबर पोलिसांनी कोरेगावात सापळा रचून जेरबंद केले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २२ ऑगस्ट : सर्वसामान्य नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती आणि एटीएम कार्ड गोळा करून सायबर फसवणूक करणाऱ्या चार जणांच्या टोळीला सातारा सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोरेगाव येथे सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी मोबाईल, एटीएम कार्ड्स आणि बुलेटसह सुमारे दोन लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
डमी खातेदार पाठवून रचला सापळा
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर मिळालेल्या माहितीनुसार सायबर पोलीस बनावट खात्यांचा मागोवा घेत होते. कोरेगाव परिसरातील काही तरुण कमिशनचे आमिष दाखवून बँक खाती व सिम कार्ड गोळा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळी आणि त्यांच्या पथकाने कोरेगाव येथील तीळगंगा नदी पुलाजवळ डमी खातेदार पाठवून सापळा रचला. एटीएम कार्ड स्वीकारण्यासाठी आलेल्या एका संशयिताला रंगेहात पकडल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून आणखी तीन साथीदारांना अटक करण्यात आली.
देशभरात ३५ हून अधिक गुन्हे उघडकीस
या संशयितांनी पुरवलेल्या बँक खात्यांवर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यांमध्ये ३५ पेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे संशयित मुख्य सायबर सूत्रधारांच्या संपर्कात टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामद्वारे होते. या कारवाईत पोलिसांनी पाच मोबाईल, आठ एटीएम कार्ड्स, जादा सिम कार्ड्स, आधार व पॅन कार्ड, ३३ हजार ६५० रुपयांची रोख रक्कम आणि एक बुलेट असा एकूण दोन लाख ३४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके अधिक तपास करत आहेत.
बँक खाती अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत
नागरिकांनी कोणत्याही कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे किंवा नातेवाईकांचे बँक खाते, एटीएम कार्ड किंवा सिम कार्ड अनोळखी व्यक्तींना देऊ नये. असे केल्यास नकळत सायबर गुन्हेगारीचे भागीदार बनून कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असा प्रकार आढळल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी केले आहे.