धोम-वाई खून खटल्यात माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ जून २०२३ | वाई|
धोम-वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांच्या न्यायालयात आजपासून सुरू झाली. माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास आज सुरू झाला. सुनावणीसाठी सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे वाई न्यायालयात आले होते. संतोष पोळ यालाही बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते.

संतोष पोळचे वकील अ‍ॅड. हुडगिकर यांनी वकीलपत्र काढून घेत कामकाज चालविणार नसल्याची पुष्टी न्यायालयास दिली. त्यानंतर संतोष पोळ याने या खटल्याचे मी स्वतः कामकाज चालवणार असल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने त्याला या कामी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील पाहिजे असल्यास उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले. मात्र, त्याने त्यास नकार दिला. त्यानंतर त्याने न्यायालयाला लेखी दिले. तुमच्या माहितीतील दुसरा कोणताही वकील तुम्हाला हवा असल्यास तुम्हाला दिला जाईल, असे न्यायालयाने पोळला सांगितले. मात्र त्याने यास नकार दिला.

या खटल्यात यापूर्वी माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे तिचा आजपासून उलट तपास संतोष पोळ याने स्वतः घेतला. यावेळी तिला नथमल भंडारी यांच्या खुनानंतर तुम्ही कुठे गेला, नंतर काय केले, आदी उलटसुलट प्रश्न विचारले. तुम्ही किती मोबाईल वापरत होता, तुमच्याकडे किती सिमकार्ड होते, असे विचारले. तिने तीन मोबाईल वापरत असल्याचे सांगितले. तिच्या मोबाईलचे नंबर पोळ याने तिला विचारले. तिने मी दोनच मोबाईल वापरत असल्याने नंबर लक्षात नसल्याचे सांगितले. तुम्ही तेरा सिमकार्ड वापरत होता. न्यायालयास खोटी माहिती देत असल्याचे पोळ तिला म्हणाला. माझ्या मोबाईलबाबत मला काही आठवत नसल्याचे तिने सांगितले. तुम्ही कोणत्या कंपनीचे मोबाईल वापरत होता, याची माहिती विचारली. त्याचे क्रमांक पुन्हा विचारले.

आज सकाळच्या व दुपारच्या सत्रात ही सुनावणी झाली. खटल्याचे कामकाज ऐकण्यासाठी न्यायालयात वकिलांनी गर्दी केली होती. आता पुढील सुनावणी १२ जून रोजी होणार आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी मोठा बंदोबस्त न्यायालय परिसरात ठेवला होता.


Back to top button
Don`t copy text!