
स्थैर्य, सातारा, दि.४: विनापरवाना आणि बेकायदा बेलगाडा शर्यतीचे आयोजन करुन बैलांना मारहाण करत दाताने शेपटी चावणाऱ्या सहाजणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दादासोा जगदाळे, शरद खरात, अनिकेत वायदंडे, संजय काळे, दिलदार झारी, विजय यादव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून त्यांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथे शिवार ढाब्याच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या जागेत बेकायदा आणि विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी येथे जावून कारवाई केली. येथे पोलिसांना न्यायालयाचा अवमान करुन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असल्याचे निदर्शनास आले. यावेळी आयोजक तसेच सहभागींकडून बैलांची शर्यत लावली होती. त्यांच्या पाठीवर चाबुकाने मारहाण करुन बैलाच्या शेपटीचा चावा घेतला जात होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक लालासाहेब देवकर यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी बैलगाडा शर्यतीत सहभागी झालेल्या दादासोा रामचंद्र जगदाळे (रा. शिरवली, ता. माण, जि. सातारा), शरद युवराज खरात (रा. आंधळी), अनिकेत संजय वायदंडे (रा. खटाव. मूळ रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा), संजय काळे (रा. आंधळी, ता. माण), दिलदार दिलावर झारी (रा. खटाव), विजय तानाजी यादव (रा. कण्हेर खेड, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला. वडूज पोलिसांनी कोणालाही अटक केली नव्हती. अधिक तपास पोलीस हवालदार एस. ए. ओंबासे करत आहेत.