स्थैर्य, खंडाळा, दि.२३: वडगाव पोतनीस, ता. खंडाळा येथील शेतमजुराने शेतामधील शेळ्यांसहित शेतातील 83 हजार 500 रुपयांचे विविध साहित्य चोरून नेल्याप्रकरणी शेतमजुरावर शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंटू फुलसिंग चव्हाण (रा.कलमल्ली तांडा, राज्य कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या शेतमजुरांचे नाव आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, लिंब ता.सातारा येथील आप्पासाहेब विष्णू सावंत यांच्या मालकीची साडेचार एकर जमीन वडगाव पोतनीस, ता. खंडाळा याठिकाणी आहे. याठिकाणी आप्पासाहेब सावंत यांनी विविध प्रकारची झाडे लावली असून शेतामधील जमिनीची मशागत करण्याकरिता कर्नाटक राज्यातील पिंटू चव्हाण याला कुटुंबियांसमवेत पगारावर ठेवलेले आहे. दरम्यान ,आप्पासाहेब सावंत हे 19 डिसेंबर 2020 रोजी वडगाव पोतनीस याठिकाणी आले असता त्याठिकाणी पिंटू चव्हाण हा शेतामध्ये कुटुंबीयांसवेत नसल्याचे आप्पासाहेब सावंत यांच्या लक्षात आले. यावेळी आप्पासाहेब सावंत यांनी शोधाशोध केली परंतू पिंटू चव्हाण हा कुटुंबियांसमवेत मिळून आला नाही.
यावेळी आप्पासाहेब सावंत यांनी शेतामधील घरात पाहणी केली असता पिंटू चव्हाण याने शेतामधील अन्नधान्यसहित शेळ्या,कोंबड्या, नारळ असा 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद आप्पासाहेब सावंत यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे हे करीत आहे.