उद्योजकीय कल्पनांची निर्मिती


स्थैर्य, फलटण, दि.१३: केंद्रीय मनुष्यबळ खाते  खूप विचारांती एका  निष्कर्षावर पोहचले की नवनवीन  कल्पनांची निर्मिती झाली पाहिजे व त्या कल्पनांचे हस्तांतरण उद्योगांना  होऊन पेटंट तयार करण्यापर्यंत आणि पुढे जाऊन मोठा उद्योग व त्यातून  रोजगार निर्मिती झाली पाहिजे. हे सर्व वाचायला व विचार करण्यास खूप छान वाटते. आपण प्रत्येक मुद्याचा सखोल अभ्यास करून हे प्रत्येक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करणे काळाची गरज आहे.  कल्पना  करणे  हे आपल्या देशात तसे  पहिले  तर  ज्याला  काही  काम  नाही  अशांचे  काम.  कल्पना करणार्‍यांना रोजगार, उत्पन्न साधन नसते.

फक्त कल्पना करून जगता येत नाही. एखादी कल्पना करण्यासाठी गरज, मानसिकता, वातावरण, वैचारिकक्षमता, बुद्धीवर ताण देण्याची गरज असते. कल्पना करणारे बहुतांशी लोक सुशिक्षित असतील किंवा उच्चशिक्षित असतील असे नाही. कल्पनेला गरज असते ती म्हणजे हेतूची, एखाद्या पारंपरिक पद्धतीमध्ये बदल  करण्याच्या धाडसाची, प्रत्येक साचेबद्ध  कामामध्ये नवीन पद्धत   शोधण्याची, त्या कल्पनेवर विश्‍वासाची व  कल्पनांची शृंखला निरंतर मनामध्ये तेवत ठेवण्याची, रुजवण्याची आणि या सर्व गोष्टीची सतत  उपासना करण्याची. हि उपासना करणारे प्रत्येक क्षेत्रात असतात. काहींना कोणत्याही क्षेत्राचे बंधनच मुळी नको असते. त्यांना कधीही, कोठेही,  कशाही विषयी उत्तम कल्पना सुचतात, काही त्यावर कार्य करतात तर काही केवळ वल्गना… तर काहींनी व्यासपीठच मिळत नाही.

सध्याच्या शिक्षण पद्धतीने निर्माण केलेली भीती, बंधने बर्‍याचदा कल्पना करण्यार्‍याच्या आड येत नाहीत. मात्र शिक्षणामुळे कल्पनांचा आकार, स्वरूप आणि त्यांची व्याप्ती सदैव तिथे घालून दिलेल्या नियमांत आणि फक्त कागदोपत्री स्वरूपात अडकून पडते. कल्पना करणारे बहुतांशी विशिष्ट क्षेत्रांत कार्यरत असतात, किंवा त्यांनी हे सर्व जवळून निरीक्षण केले असते. त्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी मनुष्य रात्रंदिवस, सतत त्या विचारांनी झपाटला जातो व वर्तमानातील पद्धत, यंत्र सामग्री यामध्ये बदल व त्यातून होणार्‍या सकारात्मक परिणामांचे स्वप्न पाहतो. स्वप्नाळूवृत्ती, ’खयालो में खो जाना’, हवेत महल बांधण्याची वृत्ती असणार्‍यांची  कल्पनाशक्ती जागृत असते व ते काहीतरी वेगळेच विचार करतात जे सर्वासाठी, मी म्हणेन सामान्यांसाठी कधी हास्याचा, तर कधी आदराचा विषय बनण्यासाठी त्या कल्पनेवर कार्य होऊन ती प्रत्येक्षात उतरवावी लागते. मग कल्पना करणे कधी वेळ खाणारे, प्रत्यक्षात न आणल्यास अर्थकारण (कल्पना करणार्‍यांचे) बिघडवणारे, बाकी सर्वांच्या विरोधास पात्र ठरतात व त्याचा खूप प्रचंड प्रमाणात बिमोड, विरोध करून त्या कल्पनाकारास कारस्थाने करून संपविले जाते. व तो पुन्हा कल्पना करण्यास धजवणार नाही  इथपर्यंत त्यास छळले जाते. ही वस्तूस्थिती आहे खाजगी उद्योगातील, शासकीय कामात तर हि कल्पनाकारांची  संस्थाच खूप कमी असु शकते. नियम व अटी खूप आऊटऑफ बॉक्स विचार करू देतच नाहीत… मग अतिकल्पनाशील होण्याच्या प्रश्‍नच येत नाही.

मला पुन्हा पुन्हा हे सागांयचेय की इथं शिक्षणाचा, पदवीचा काही एक सबंध नाही. हे अवलिया, कल्पनांकार एक कलाकार आहेत… हे हुन्नरी लोक आपल्या विश्‍वात गुंग असतात, त्यांचा जगरहाटीशी काहीएक संबंध नसतो, बर्‍याचदा त्यामुळेच हे  कल्पनांधीश दुर्लक्षित, प्रमाणापेक्षा अविकसित, आर्थिकदृष्ट्या गांजलेले असू शकतात. या लोकांना शोधणे, त्यानं एकत्र आणणे आणि त्यांच्या कल्पनांनां वाव देणे खूपच देशहिताचे ठरेल परंतु हे सर्व शक्य आहे जेव्हा केवळ कल्पना करून त्या व्यक्तीला रोजगार किंवा अर्थप्राप्ती होईल आणि त्या कल्पनांचा उद्योग वर्गाला त्याप्रमाणात फायदा होईल. यामध्ये बर्‍याच कल्पना अवांतर किंवा प्रत्यक्षात उत्तरविणे तितकेसे सुलभ असू शकणात नाही… परंतु त्यामुळे कल्पना करणे पूर्णपणे बंद होणे हे मात्र खूपच घातक.कल्पनांचे आगार तयार करण्यासाठी,
1) या सर्व क्षेत्रातील कार्यरत, कार्यकरीत नसलेले किंवा सध्या वेगळ्याच ठिकाणी नशीब अजमावणारे, एका व्यासपीठावर एकत्र आणले पाहिजेत.
2) फक्त कल्पना घेतली आणि त्याला योग्य मोबदला दिला नाही तर तो मोठा अन्याय ठरेल.
3) प्रथम या कल्पनाधिशांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्याची गरज आहे. त्यांचे प्रापंचिक प्रश्‍न मिटवले पाहिजेत.
4) त्यांना वैचारीक रित्या पाठींबा देऊन सबळ करण्याची गरज आहे.
5) त्यांची कुठ्ल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे
6) हे लोक कलाकार, स्वताच्या विश्‍वात जगणारे, वेळेचे बंधन न पाळणारे, व जगाच्या रीतीभाती न समजणारे असु शकतात.
7) कल्पनाधिशांना त्याच्यातील गुण दोषांसहीत स्वीकारून, त्यांना समर्थ साथ देऊन योग्य वातावरण, कार्यस्थळ, प्रात्यक्षिकगृह व महत्वाचे म्हणजे भरपूर वेळ, त्यांना हवा तसा हे सर्व पुरविले तर नक्कीच नव कल्पना बाहेर पडतील.
8) यांना बाकी क्षेत्रातील लोकांचे पाठबळ पुरविणे तसेच हव्या त्या क्षेत्रात ढवळाढवळ (कल्पना) सुचविण्याचे स्वातंत्र देणे महत्वाचे आहे.
9) उत्तम कार्य करण्यासाठीचे वातावरण, पारदर्शक व्यवहार, कल्पना करण्यासाठी पाठबळ, खंबीर साथ कल्पनांधिशांना मिळावी पाहिजे.
10) कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्वच क्षेत्रातील अवलिया एकत्र येऊन काम करणे अपेक्षित आहे. तिथे मूळ कल्पनाकार,मदतीला आलेले  कल्पनाकार  यांचा  मोबदला या सर्वांचा विचार केला गेला पाहिजे तसेच कल्पनाधिशाना देश हिताच्या भावनेने दिशेने प्रेरीत करून, त्यांना कार्यप्रणाली  देण्याची गरज आहे.

हा सध्याच्या बेरोजगारी, गरीबी यांवर एक रामबाण उपाय ठरू शकेल. सध्या बाकी सर्व देश जे आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत हे केवळ बौद्धिक क्षमता या कारणामुळे, ते भारतावर अप्रत्यक्षरित्या राज्य करतायेत म्हणूनच भारताला या सर्वाना तोंड द्यायचे असल्यास कल्पनाशक्तीचा मग तो विद्यार्थ्यांच्या, कामगारांच्या, शास्त्रज्ञाच्या असो विकास करणे, एका व्यासपीठावर आणणे आणि त्यांना योग्य आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या कल्पनांच्या देश  हितासाठी  सुयोग्य वापर करणे हेअपरिहार्य आहे.

– श्री.विकास भरतकुमार ढालपे,फलटण, मो.9529787745 / 9766462109.


Back to top button
Don`t copy text!