
साताऱ्यात पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्याचे काम सुरू असल्याने ३० सप्टेंबरपर्यंत जड वाहनांना बंदी आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
स्थैर्य, सातारा, दि. 10 जुलै : सातारा शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने या मार्गावर १० जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी हा निर्णय घेतला असून अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे.
अवजड वाहनांना प्रवेश बंद
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे काम सुरू आहे. एकाच मार्गिकेवरून वाहतूक सुरू असल्याने मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट आणि बॉम्बे रेस्टॉरंट ते पोवई नाका या दोन्ही बाजूंनी एसटी बस, ट्रक, डंपर, ट्रॅक्टर आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावर फक्त दुचाकी, कार, स्कूल बस, रिक्षा, रुग्णवाहिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे, मुंबई, कोरेगाव आणि सोलापूरकडे जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या एसटी बसेस आणि अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. ही वाहने जुनी जिल्हा मध्यवर्ती बँक, पोलीस परेड मैदान, पारंगे चौक, जुना आरटीओ चौक आणि वाढे फाटा या मार्गे शहरात ये-जा करतील. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पिंगळे यांनी केले आहे.