स्थैर्य, सातारा, दि. 22 : सलग साडेतीन महिने सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेक छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती तर या करोना संकटामुळे अनेकांना आपले पारंपरिक व्यवसाय बंद करून लॉकडाउनमध्ये तेजीत चालणारे व्यवसाय नाइलाजास्तव स्वीकारावे लागले.
दुष्काळी खटाव तालुक्यात अगोदरच व्यवसायावर महामारी, त्यात भरीस भर करोना च्या संकटाने पारंपरिक व्यवसायाला ग्रहण लागले. या संकटामुळे लग्नसराई, धार्मिक उत्सव, सण, यात्रा-जत्रा लुप्त झाल्या. हातावरचे पोट असणारे व्यवसाय तर मोडीतच निघाले. उन्हाळी सुट्टी पूर्णपणे लॉकडाउनमध्ये गेल्याने अनेक व्यावसायिकांना उपासमारी करावी लागली. प्रामुख्याने यामध्ये मंगल कार्यालये, मंडपवाले, बँडपथकवाले, फोटोग्राफर, हार-फुलवाले, बांगडी, बाशिंग व्यावसायिक, आदींसह अनेक व्यावसायिक विचाराधीन झाले. असाच एक तिसर्या पिढीतील व्यावसायिक गणेश भोसले यांचा पारंपरिक फुलांचा व्यवसाय सुरू होता. एकत्रित कुटुंब असल्याने खाणारी तोंडे जादा, त्यामुळे किती दिवस लागतील ही परिस्थिती सुधारायला सांगता येणार नाही. हे ओळखून फुलांच्या दुकानातच भाजी व्यवसाय सुरू केला. फुलांमुळे शेतकर्यांशी असणारी जवळीक या नूतन व्यवसायाला तारून नेणारी ठरली.
फुलांच्या हार्यात ताजी भाजी दिसू लागली. प्रारंभी हा व्यवसाय करताना त्यांना अंनत अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र प्राप्त परिस्थितीवर मात करीत हाही व्यवसाय नाममात्र नफ्यावर केला. त्यामुळे इतर फुलवाल्यांनी सुद्धा हा व्यवसाय स्वीकारत जम बसविला. वेळ आणि काळ सांगून येत नाही, हे निसर्गाने दाखवून दिले असल्याची प्रतिक्रया गणेश भोसले यांनी व्यक्त केली.
या भाजीपाला व्यवसायाने शेतकर्यांनीही नूतन व्याव-सायिकांना मोलाची साथ दिली तर व्यवसाय बदलणार्या नांही जिद्ध व चिकाटीमुळे तात्पुरता का होईना दिलासा मिळाला.