
स्थैर्य, फलटण, दि. २० : सातारा जिल्ह्यामध्ये शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण जागेअभावी त्यांच्याकडून नियम पाळले जात नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेले होते. त्याला फलटण तालुक्यातून प्रतिसाद येत असून फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये लोकसहभागातून कोरोना केअर सेंटर उभे राहत आहेत.
फलटण तालुक्यामध्ये साठे येथे कोरोना केअर सेंटर सुरु झालेले आहे. तर कोळकी येथे फुलाई गार्डन येथे आगामी काही दिवसांमध्ये कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. या सोबतच साखरवाडी येथे श्री दत्त इंडिया कंपनी मार्फत गेले काही दिवस कोव्हीड केअर सेंटर सुरु आहे. तरडगाव येथील सुद्धा मंगल कार्यालयामध्ये कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय झालेला आहे. या सोबतच पिंप्रद येथे सुद्धा कोव्हीड केअर सेंटर सुरु होणार आहे. आगामी काही दिवसात फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचे नियोजन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
कोरोनाच्या संकटात वैद्यकीय सेवेचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. यातून आणखी आरोग्य सुविधा वाढविल्या पाहिजेत. यापुढे कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी नागरिकांनी घाबरुन न जाता शासन, प्रशासनाला साथ द्या. तुमच्यासाठी आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये लोकसहभागातून कोव्हीड केअर सेंटर उभे राहत आहेत. त्याला नागरिकांनी पूर्णतः सहकार्य करणे गरजेचे आहे. गृह विलीगीकरणामध्ये न राहता संस्थामक विलीगीकरण करण्यासाठी कोव्हीड केअर सेंटर मधून वैद्यकीय उपचार घेणेच गरजेचे आहे, असे मत तालुक्यातील जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.
सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी-अधिक आढळत आहे. यामध्ये तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता जिल्हा परिषद गटनिहाय कोरोना केअर सेंटर उभे करणे हे गरजेचे आहे. कोरोना केअर सेंटर हे लोकसहभागातून उभारत आहेत तर सदरील कोरोना केअर सेंटरला प्रशासनाचे सुद्धा सहकार्य मिळणार आहे. काही नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे असली तरी ते डॉक्टरांकडे जात नाहीत, आजार गंभीर झाल्यानंतर ते डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल होतात. असे न करता लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांचा उपचार घ्यावा. ज्या कुटुंबामध्ये कोरोना बाधित रुग्ण आहेत. अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. लॉकडाऊनमध्ये जे निर्बंध घातले आहेत त्याचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षीत अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहनही विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी केलेले आहे.