लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज इमारतीतही करोनाचा शिरकाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि. ३० : गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत करोनाचा रुग्ण आढळल्याने मुंबई महापालिकेने ही इमारत सील केली आहे. या इमारतीत बुजुर्ग व्यक्ती अधिक राहत असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून काल संध्याकाळी ही कार्यवाही केली.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच मुंबईतील करोनाची संख्या नियंत्रणात येत असतानाच लता मंगेशकर राहत असलेल्या प्रभुकुंज सोसायटीत करोना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सोसायटीत राहणाऱ्यांमध्ये बुजुर्गांची संख्या अधिक असल्याने ही सोसायटी सील करण्यात आली आहे. ही संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज करण्यात येणार असून सोसायटी परिसरात औषध फवारणीही केली जाणार आहे. या सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर राहतात.

दरम्यान, पालिकेच्या कार्यवाही नंतर लता मंगेशकर यांना विचारपूस करणारे फोन येऊ लागल्याने त्यांनी एक पत्रक काढून त्याबाबतची माहिती दिली आहे. प्रभुकुंज सोसायटी बंद करण्यात आली आहे का? याची विचारणा करणारे फोन आम्हाला संध्याकाळपासून येत आहेत. बिल्डिंगची सोसायटी आणि महापालिकेने इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुजुर्गांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ही इमारत सील करण्यात आली आहे. करोना संसर्गापासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असं लता मंगेशकर यांनी निवेदनात म्हटलं आहे.

करोनाचा प्रकोप पाहता आमच्या सोसायटीत साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आमच्या कुटुंबातील सर्वांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे कुटुंबीयांबाबत कृपया कोणीही अफवा पसरवू नका. एक कुटुंब म्हणून सोसायटीतील सर्वजण करोनाबाबत सतर्क असून करोना रोखण्याबाबतच्या नियमांचं काटेकोरपालन करत आहेत. सोसायटीतील बुजुर्ग व्यक्तींना काहीही होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. सध्या देवाच्या कृपेने आणि लोकांच्या आशीर्वादाने आमचं कुटुंब सुरक्षित आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!