शुक्रवारी लडाखच्या झटापटी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विरोधकांची एक बैठक घेतली. अशा प्रसंगी कसे वागायचे असते, त्याचे भान किती लोकांना होते असा त्यातून पहिला प्रश्न निर्माण होतो. किंबहूना शरद पवार या एकाच नेत्याने आपल्या अनुभवी प्रगल्भतेची साक्ष दिली. अन्यथा विरोधकात दोन तट पडलेले स्पष्ट दिसून आले. भारतातल्या राजकीय व्यवस्थेमध्ये कुठे भेगा व खिंडारे पडलेली असतील, त्यावर चीनचे बारीक लक्ष असणार, याचे भान राहुल गांधींना नसले तर समजू शकते. पण इतर पक्षांना किंवा त्यांच्या नेत्यांना कितीसे भान होते? खुद्द सोनिया गांधीच स्पष्ट शब्दात चीनचा निषेध करायला राजी नव्हत्या; किंवा आपला पक्ष ठामपणे सरकारच्या पाठीशी उभा असल्याचे सांगू शकल्या नाहीत. तर आम आदमी पक्ष वा राष्ट्रीय जनता दल यांनी आपल्याला आमंत्रणच मिळाले नाही, म्हणून हातपाय आपटून दाखवले. मुळात हा काही आनंद सोहळा किंवा लग्न समारंभ नव्हता, की आमंत्रण वा मानपानाच्या गोष्टी तिथे व्हायच्या होत्या. त्यात राजकीय पक्षांना व विरोधकांना विश्वासात घेण्याचा मुद्दा मोलाचा होता. एकट्या शरद पवारांनी त्याची जाण दाखवली. हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून त्याबाबतीत पोक्तपणे वागले पाहिजे; अशी भूमिका त्यांनी मांडली. तर डाव्या दोन्ही पक्षांनी चीनचा साधा निषेध करण्यापेक्षा कालबाह्य धोरणाचा आग्रह धरला. एकाधिकारशाही वा हुकूमशाहीपुढे लोकशाही का हतबल होते, त्याची साक्ष यातून मिळत असते. चीन नुसता बलाढ्य नाही, तर तिथे सरकारला कुठल्याही बाबतीत उलटे प्रश्न विचारण्याची मुभा नसते, हे त्याचे बलस्थान आहे. किंबहूना तीच भारताची दुबळी बाजू आहे. कारण इथे राहुल गांधींसारखे लोक कुठलेही बालिश प्रश्न नित्यनेमाने विचारून सरकारी कारभारात व्यत्यय आणायला मोकळे असतात. सामान्य नागरिका इतकाही समजूतदारपणा त्यांच्यात नसतो. याची साक्ष पंजाबच्या एका शहीद सैनिकाच्या पित्यानेच दिलेली आहे.
काही दिवसांपुर्वी काश्मिरात अजय पंडिता नावाच्या सरपंचाची जिहादींनी हत्या केली. तर त्याची मुलगी जनतेपुढे येऊन आपल्या पित्याच्या हौतात्म्याचे समर्थन करत होती आणि कॉग्रेस नेता शशी थरूर मात्र त्यातही राजकारण शोधत होते. पंडिता हा कॉग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा सरपंच होता. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या कॉग्रेसमुक्त भारत धोषणेनुसारच त्याची हत्या झाली, असा अशिशय छछोरपणा थरूर यांनी केला. अर्थात त्यांच्याच पक्षाचा ज्येष्ठ नेता राहुल गांधीच त्यापेक्षाही भयानक बालिशपणा नित्यनेमाने करीत असेल, तर बाकीच्या कॉग्रेस नेत्यांकडून वेगळी अपेक्षा कशी करता येईल? सहाजिकच राहुल गांधी जगातल्या कुठल्याही घडामोडींविषयी मोदींना सवाल विचारत असतात. चिकित्सक वृत्तीच्या माणसाला अनेक प्रश्न सतत पडत असतात आणि त्यांची उत्तरे शोधणे किंवा विचारणा करण्यात काहीही गैर नसते. पण निदान उत्तर काय मिळाले, त्याचाही अभ्यास करायला हवा असतो. त्याची जाणिवही राहुलना नाही. म्हणून ते प्रश्न विचारतात आणि विसरूनही जातात. नवा दिवस नवा प्रश्न असली चिनी सुरसकथा सध्या त्यांनी लिहायला घेतलेली असावी. अन्यथा हे प्रश्न त्यांनी कशाला विचारले असते? त्यांची माताही कौतुकाने पुत्राच्या प्रश्नांचा पुनरूच्चार करीत असते. पण त्याची उत्तरे काय मिळतात वा एकूण घडामोडीत त्या प्रश्नांमुळे काय प्रभाव पडतो, त्याची फ़िकीर दोघेही करीत नाहीत. किमान आपण या देशाचा कारभार सत्ताधारी पक्ष म्हणून दहा वर्षे चालविला आहे आणि आपल्या खानदानाने कित्येक दशके देशाचे सरकार चालवले आहे, त्याचे भान यापैकी एकाला असायला हवे ना? असते तरी त्यांना यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरे परस्पर मिळू शकली असती किंवा कुणाकडे उत्तरे मागावित हे समजले असते. दहा वर्षे आपला देश कुणाच्या तावडीत सापडलेला होता आणि मोदी कॉग्रेसमुक्त कशाला म्हणतात, ते लोकांना पटवून देण्याची कामगिरीच जणू राहुल सोनिया पार पाडत असावेत. अन्यथा त्यांच्याकडून असल्या प्रश्नांचा भडीमार होऊ शकला नसता.
देशाचा इतिहास सोडा आणि निदान आपल्या खानदानाचा इतिहास तरी या मायलेकरांना ठाऊक असायला हवा ना? आज २० सैनिक शहीद झाले म्हणून त्यात राजकारण खेळणार्या सोनिया व राहुलना आपल्या हेरखात्याचे अपयश दिसते आहे. पण मग ज्यांच्या पुण्याईवर हे दोघे आज जगत आहेत, त्यांच्या हौतात्म्याचे काय? इंदिराजी व राजिव गांधी यांच्याही देशाच्या शत्रुंनी हत्याच केल्या होत्या. ते दोघे कुठे हिमालयाच्या कड्यावर जाऊन उभे राहिले नव्हते, की शत्रूच्या वेढ्यात अडकलेले नव्हते. कडेकोट सुरक्षा कवचात दोघेही वावरत होते आणि सभोवती कायम सुरक्षा रक्षकांचा घेरा असायचा. तरीही अतिरेक्यांनी त्यांच्या हत्या केल्या. तेव्हा हेरखाते झोपा काढत होते काय? इंदिराजी तर स्वत:च पंतप्रधान व देशाच्या कारभारी होत्या आणि देशाची सुरक्षाच त्यांच्या हातात होती. त्यांना सुरक्षित राखण्यासाठी शंभराहून अधिक सशस्त्र सैनिक कायम सज्ज असायचे. त्यापैकीच दोघांनी इंदिराजीवर रहात्या घरात गोळ्या झाडल्या होत्या. त्याला दक्ष बंदोबस्त वा कडेकोट हेरखाते म्हणतात काय? मेरी दादी वा मेरी सास असा कायम उल्लेख करणार्या मायलेकरांना त्या हत्येविषयी काय म्हणायचे आहे? आमच्या काळात सुरक्षा किती कडेकोट व अभेद्य होती, असा दावा त्यांना तरी करता येईल काय? इतकी अभेद्य सुरक्षा पंतप्रधानाच्या घरात भेदली जाऊ शकत असेल, तर प्रत्यक्ष सीमेवर आणि युद्धभूमीवर सुरक्षा म्हणजे काय असते? राहुल गांधींना त्या कार्टून फ़िल्म वाटतात काय? तिथे सैनिकांच्या हातात शस्त्रे का नव्हती? नसतील तर त्यांना कोणी शस्त्रापासून वंचित ठेवले? शस्त्रे असतील तर त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी शस्त्राचा वापर कशाला केला नाही? देशाला हे समजले पाहिजे. कारभार पारदर्शक हवा असल्या वल्गना करणार्यांना नॅशनल हेराल्ड कंपनीच्या अर्थकारणाचा तपशील लपवायचा आटापिटा कशाला करावा लागतो?
कॉग्रेस पक्षाला जी रक्कम करमुक्त मार्गाने देणगी म्हणून मिळालेली आहे, तिची उलाढाल सार्वजनिक करण्याची खळखळ ही मायलेकरे कशाला करतात? जावई रॉबर्ट वाड्रा याच्या आर्थिक व्यवहाराची छाननी व्हायला लागली, मग त्याचे प्राण कासावीस कशाला होतात? तेव्हा पारदर्शकतेची आठवण कशाला रहात नाही? कारण कॉग्रेसच्या तिजोरीतली देणगी रुपाने जमलेली रक्कम नेहरू गांधी खानदानाची व्यक्तीगत वा कौटुंबिक कमाई नसते. एका पक्षाला मिळालेली देणगी असते आणि ती सार्वजनिक कामासाठी वापरण्याचेच त्यावर बंधन असते. तीच रक्कम खानदानी कंपनीत वळवणे व नंतर बुडीत म्हणून माफ़ करण्यातून कोणते राष्ट्रीय कार्य मायलेकरे करतात? कधी त्याचाही खुलासा व्हायला नको काय? जितके प्रश्न राहुलना पडतात, त्याच्या लाखो पटीने अधिक प्रश्न जनतेच्या मनामध्ये कित्येक वर्षापासून या खानदानासाठी तळमळत आहेत. जेव्हा नॅशनल हेराल्डच्या आर्थिक व्यवहाराचा प्रश्न सुब्रमण्यम स्वामींनी भारत सरकारच्या कंपनी खात्याला विचारला, त्याचे उत्तर कित्येक वर्षे मिळालेले नव्हते. मोदी सरकार सत्तेत आल्यावर ते उत्तर किंवा कागदपत्रे स्वामींना मिळू शकली. तोपर्यंत या मायलेकरांनी केलेल्या घोटाळ्याचा विषय गुलदस्त्यात गुंडाळून ठेवला गेलेला होता. जेव्हा प्रकरण कोर्टात पोहोचले, तेव्हा छाती फ़ुगवून आपली पारदर्शकता दाखवायला राहुल पुढे सरसावले नाहीत. उलट तीन कोर्टात जाऊन त्यावर पडदा पाडायचा आटापिटा करण्यात आला. फ़रारी होणार नाही म्हणून कोर्टाला जातमुचलका लिहून द्यावा लागलेला आहे. अशा लोकांनी भारत सरकारला लडाखच्या झटापटीवर प्रश्न विचारावेत हा विनोद आहे की शोकांतिका आहे? एकूणच कॉग्रेस पक्ष कसा देशद्रोही होत गेला आहे, त्याची साक्ष राहुल नित्यनेमाने देत असतात. याचा अर्थ कॉग्रेस पक्ष स्वातंत्र्य चळवळीचा वारसा सांगणारा नाही असा बिलकुल नाही. आज तो कॉग्रेस पक्ष तसा उरलेला नसून पुरता राष्ट्रविघातक मार्गाने वाटचाल करतो आहे. म्हणून तर मतदाराने त्याला विरोधी नेतृत्वाच्याही लायकीचा ठेवलेला नाही.
तुम्हाला आठवते? २०१४ च्या जानेवारीत राहुल गांधींना कॉग्रेसने विशेष पद निर्माण करून जयपूर अधिवेशनात उपाध्यक्षपदी बसवले होते. तेव्हा जयपूरला दिलेल्या भाषणात राहुल गांधी अगत्याने काय बोलले होते? इन्होने मेरी दादी को मारा, इन्होने मेरी पापा को मारा. त्यातला ‘इन्होने’ म्हणजे कोण? दहशतवादी खलिस्तानी म्हणजे पाकच्या इशार्यावर हिंसाचार करणारेच होते ना? आपल्या पिता व आजीच्या हौतात्म्याचे राजकीय भांडवल करून मतांचा जोगवा मागणार्यांना हौतात्म्याची फ़क्त व्यापारी किंमत कळते. हौतात्म्य हे विकावू नसते किंवा बाजारात त्याची किंमत होऊ शकत नाही, अशी हौतात्म्य ही अनमोल गोष्ट आहे. हे ज्यांना माहितीच नाही, त्यांनाच राहुल गांधी म्हणून जग ओळखते. त्यांना लडाखमध्ये नुकताच हौतात्म्य पत्करलेल्या जवानाच्या पित्याच्या शब्दातला आशय कसा कळावा? त्याला अजय पंडिताच्या कन्येचा टाहो कसा कळणार? ते दोघेही हात जोडून म्हणत आहेत, आमच्या जीवलगांच्या हौतात्म्याचे कृपया राजकीय भांडवल करू नका. ते भांडवल कोण करतोय? राहुल आणि कॉग्रेस पक्षच त्याचे भांडवल करीत आहेत ना? अर्थात बिचार्या खर्या हुतात्म्यांना वा त्यांच्या आप्तस्वकीयांना ह्या गांधी खानदानाची व्यापारी वृत्ती कधीच समजणार नाही. जे आपल्याच घरातल्या हौतात्म्याचे व्यापारीकरण करू शकतात, त्यांना इतरांच्या हौतात्म्याचे दुकान मांडायची शरम कशाला वाटणार ना? म्हणूनच राहुलना असले प्रश्न सुचतात आणि ते बोलून दाखवण्याची लाज वाटत नाही. त्यामुळे देशाची सुरक्षा करणार्या व त्यासाठी आपला जीव धोक्यात घालणार्या सैनिकांच्या त्यागाची किंमत कळू शकणार नाही. त्यांना पिढीजात त्यागाची किंमत देशाने मोजावी यापलिकडे राजकारण करता आलेले नाही. त्यांच्याकडून सामान्य माणसे काय अपेक्षा करू शकतात? म्हणून तर हौतात्म्याचा तो बाजार जनतेने मतदानातून थांबवला आहे.
सत्तर वर्षे उलटून गेली तरी ह्या खानदानाने फ़क्त देशाकडून किंमत वसूल केली आहे. वाड्रापासून सोनियांपर्यंत इतकी अफ़ाट संपत्ती कुठून जमा झाली, त्याची पारदर्शक उत्तरे म्हणून देता येत नाहीत. मग आपली पापे लपवायला उलट्या बोंबा ठोकाव्या लागतात. भारताची किती जमिन चीनला दिली वा चीनने बळकावली; असले प्रश्न विचारण्यापुर्वी राहुलनी आपल्या पणजोबांनी चीनला किती जमिन दिली, त्याची छाननी केली का? २८ हजार चौरस किलोमीटर्स जमिन चीनने नेहरू पंतप्रधान असताना बळकावली आणि तेव्हा शेकडो भारतीय जवान जीवानिशी गेले. त्यांना शस्त्रास्त्रे व युद्ध साहित्य पुरवण्यापेक्षा नेहरूंच्या सरकारने त्यांच्याकडे पाठ फ़िरवली होती. त्याचीच किंमत देशाला अजून मोजावी लागते आहे. चीन जिथे आज ठाण मांडून बसला आहे, ती भूमीच भारताची असून उरलेल्या भारतीय भूमीवर चीन दावा सांगतो आहे. सुदैव असे, की आज नेहरूंचा कोणी वंशज सत्तेवर नाही. अन्यथा इतक्यात लडाखही चिनच्या हवाली करून हे लोक मोकळे झाले असते. नेहरूंच्या जागी मोदी आहेत, म्हणून चीनला निदान टक्कर दिली जाते आहे. बहुधा त्यामुळेच राहुल गांधी व सोनिया इतके विचलीत झालेले असावेत. कारण त्यांनी २००८ सालात चिनी कम्युनिस्ट पक्षाशी बंधूभावाचा करार केलेला आहे. त्यातला बंधूभाव चिन्यांशी असून त्यात मोदी ही अडचण झाल्यावर त्याच्यावर शब्दांच्या तोफ़ा डागणे भागच आहे ना? सवाल चीनने भारताची लडाखमधली किती जमिन व्यापली असा नसून त्यात मोदी अडथळा कशाला बनले आहेत, ही राहुल सोनियांची पोटदुखी आहे. म्हणून तिथल्या झटापटीविषयी बोलताना ते चीनला जाब विचारत नाहीत किंवा दोष देत नाहीत, देशाच्याच सरकारला जाब विचारत आहेत. पण चकार शब्दाने चीनला दोष देणार नाहीत. मोदींनी देशासाठी प्राण पणाला लावणारी फ़ौज समोर उभी केली, ही पोटदुखी आहे ना?
आता राहुलच्या प्रश्नांचा आशय समजून घ्या. नेमके काय चालले आहे, त्याची माहिती त्यांना कशाला हवी आहे? ती माहिती घेऊन राहुल काय करणार आहेत? तिचा राहुलना उपयोग काय? पण तीच माहिती चिनी रणनितीसाठी बहूमोलाची आहे. भारताशी लडाखमधली रणनिती काय आणि काय हालचाली होत आहेत, त्यावर चीनी सैन्याची युद्धनिती ठरत असते. किंवा त्यांच्या रणनितीनुसार आपली युद्धनिती ठरत असते. दोघांना आपापली रणनिती गोपनीय ठेवावी लागते. त्याबाबतीत चीन सुरक्षित आहे. कारण त्यांच्या देशात किंवा राजकीय व्यवस्थेत कोणी राहुल गांधी नाहीत वा भारताला उपयुक्त ठरेल असे प्रश्न विचारणारा कोणी नाही. सहाजिकच अशी माहिती लपूनछपून हेरगिरी करून भारताला मिळवावी लागत असते. पण चीनला तशी मदत उजळमाथ्याने राहुल गांधी व इथले पुरोगामी डावे पक्ष करीत असतात. त्यांना भारताची रणनिती पारदर्शक हवी असते, याचा अर्थच ती चीनला राजरोस कळावी असा असतो. अजून चिनी सैनिक किती मारले गेले वा जखमी झाले त्यावर चीनने मौन धारण केले आहे. भारताने आपल्या जवानांचा सर्व तपशील दिला आहे. त्यातून राहुल वा कॉग्रेसने काय साध्य केले? चीनला इथली माहिती मिळू शकली. पण चिनी नुकसान वा त्यानंतरच्या रणनितीची माहिती भारताला सहज मिळू शकलेली नाही. मिळवावी लागणार आहे. त्यांचे लाड मोदी कशाला करतात? ही माहिती कशाला देतात? तर आपल्याकडे लोकशाही राज्यप्रणाली आहे आणि त्यात शक्य तितका पारदर्शक कारभार करण्याची सक्ती आहे. लोकशाहीतला तो दोष आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला व सरकारला अनेक कसरती कराव्या लागतात. त्याला लपवाछपवी म्हणत नाहीत. गोपनीयता म्हणतात, जी कुठल्याही युद्धात व कुटनितीचा अविभाज्य भाग असतो. ते सत्य राहुलना समजू शकले नाही, तरी स्वत:ला बुद्धीजिवी म्हणवून घेणार्यांच्या मेंदुत शिरावे, ही अपेक्षाही चुकीची आहे काय?