तिलारी प्रकल्प मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा; दुसऱ्या टप्प्यास १५ जुलैपर्यंत मंजुरी घ्यावी – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । मुंबई । तिलारी प्रकल्पावर आधारित १८ गावे, वेंगुर्ला शहर व मार्गस्थ औद्योगिक क्षेत्र आणि पर्यटनस्थळांसाठी पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा तसेच तिलारी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत मंजुरी घ्यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात तिलारी प्रकल्पावर आधारित प्रकल्पाविषयी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्यासह रा. पा. निघोट, सी. आर. गजभिये, प्रशांत भामरे, नितीन उपरोल, डी. एच. अरगडे, यु. एच. महाजन आदी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, मंजूर योजनेनुसार तिलारी धरणापासून 25 किलोमीटर अंतरावर सासोली येथे तिलारी नदीच्या उजव्या तीरावर जॅकवेल व पंपगृह बांधण्यात येत असून त्यास लागून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात येत आहे. जॅकवेल मधून पाणी व्हर्टिकल टर्बाईन पंपाद्वारे उपसून डेगवे येथील दाबमोड टाकीत घेऊन व तेथून लाभधारक कंपनी उत्तम स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेड (SUSPL) सातार्डे यांना लागणारे शुद्धीकरण विरहित पाणी थेट पाइपलाइनद्वारे पुरविण्यात येणार होते. उर्वरित पाणी डेगवे येथेच प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करुन पाईप लाईनद्वारे वेंगुर्ले पर्यंत नेले जाणार असून मार्गस्थ लाभधारक गावांना, पर्यटन व आद्यौगिक क्षेत्रात तसेच वेंगुर्ला शहरास पाणी पुरविण्यात येणार आहे.

तिलारी प्रकल्पाची योजना राबविण्यासाठी सहभागी ठेकेदार मे.श्री उत्तम स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेड (SUSPL) यांच्याबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सामंजस्य करार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.पाटील म्हणाले, योजनेंतर्गत प्रस्तावित उपांगांच्या जमिनी ताब्यात घेण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. योजनेसाठी आवश्यक इतर खात्यांकडून उदा. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूसंपादन शाखा (जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग) परवानग्या प्राप्त करण्यासाठी सर्व कार्यवाही पूर्ण केली आहे. योजनेंतर्गत प्रस्तावित गुरुत्ववाहिन्यांकरीता ७७.२३ कि.मी. इतक्या सर्व लांबीच्या डी. आय. पाईप्सचा पुरवठा करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!