स्थैर्य, मुंबई, दि.२९: कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा
नवरा हर्ष लिंबाचिया हे मागील काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत
आहेत. भारती आणि हर्ष यांनी ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली एनसीबीकडे दिली
आहे. त्यानंतर त्यांना अटकदेखील झाली होती. सध्या दोघेही जामीनावर बाहेर
आहेत. या सर्व घटनेमुळे भारतीवर सर्व स्तरातूनआता टिका होऊ लागली आहे.
यामुळे सोनी टीव्हीने आता भारतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त
आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे सोनी टीव्हीने
भारतीची ‘द कपिल शर्मा शो’मधूनही हकालपट्टी केल्याचे कळते आहे. मात्र
अद्याप चॅनेलकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.
भारती
कपिल शर्मा शोमध्ये दिसणार नसल्याचे समजते. मात्र चॅनेलचा हा निर्णय
कपिलला मान्य नाही. सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भारतीवर बंदी
घालू नये, असे कपिलचे म्हणणे आहे. कपिल शर्मा शो हा फॅमिली शो आहे.
त्यामुळे या शोमध्ये कोणत्याही वादग्रस्त व्यक्तींनी सहभागी नसावे, अशी
चॅनेलची इच्छा आहे.
सोनी
टीव्हीने एखाद्या कलाकाराशी बंदी घालण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी
प्रसिद्ध संगीतकार अनु मलिकवर अनेक सेलिब्रिटींनी ‘मीटू’ आरोप केले तेव्हा
सोनी टीव्हीने त्यांना चॅनेलमधून बाहेरचा मार्ग दाखवला होता.
ड्रग्ज प्रकरणात कसे समोर आले होते भारती आणि हर्षचे नाव?
अभिनेता
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर
आले. एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला होता. कारवाईत
अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती.
त्याच्याकडून 15 एलएसडी डॉट्स, 40 ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी
अंमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून भारती आणि
तिच्या नव-याचे नाव समोर आले होते.
21
नोव्हेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाने भारतीच्या घरावर छापा टाकला
होता. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने
दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष
यांनी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर
एनसीबीने एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत
त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या दोघांनाही मुंबई
किल्ला कोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची म्हणजे 4 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन
कोठडी सुनावली होती. मात्र नंतर दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. 23
नोव्हेंबर रोजी दोघांना जामीन मंजूर झाला होता.