आ. शिवेंद्रसिंहराजे; अजिंक्यतारा कारखान्यातील कर्मचारी शेलार यांचा सत्कार


स्थैर्य, सातारा, दि.२: आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण धावपळीत असतो. कोणाला कोणासाठी वेळ नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत एखाद्याची हरवलेली किमती वस्तू परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवणारे लोक पाहिले कि माणुसकी अजून जिवंत असल्याची प्रचिती येते असे प्रतिपादन करून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी हरिभाऊ शेलार यांच्या पाठीवर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कौतुकाची थाप मारली.

अजिंक्यतारा कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल नेहमीच कौतुकाने पाहिले जाते. खटाव तालुक्यातील होळीचे गाव येथील विकास दिनकर ओव्हाळे हे त्यांच्या दुचाकी वाहनाचे आर.टी.ओ. पासिंग करण्यासाठी दि.१ जानेवारी रोजी दुपारी १.३० ते २.00 वाजेचे दरम्यान सातारा येथील आर.टी.ओ. कार्यालयाकडे जात असतांना त्यांचे पाकीट एमआयडीसी परिसरात हरवले. याच परिसरातून अजिंक्यतारा कारखान्याचे शेती विभागाचे कर्मचारी हरीभाऊ बाबुराव शेलार हे रस्त्याने जात असतांना त्यांना पाकीट सापडले. पाकिटामध्ये रोख रक्कम रू.७,०३०/- तसेच एटीएम, आधार, मतदान कार्ड, ड्रायव्हींग लायसन व पॅनकार्ड आदी आढळून आले. शेलार यांनी सदरचे पाकीट रोख रक्कम व महत्वाच्या कागदपत्रांसह कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्याकडे जमा केले.

देसाई यांनी संबंधीत विकास ओव्हाळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाकीट घेऊन जाण्याचे कळविले. हरविलेले पाकीट घेण्यासाठी ओव्हाळे हे शनिवार दि. २ रोजी कारखाना कार्यस्थळावर आले. पाकीट परत मिळाल्याबद्दल ओव्हाळे यांनी शेलार यांच्यासह कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक सयाजीराव ताटे, अनंता वाघमारे, कार्यकारी  संचालक देसाई यांचेही आभार मानले. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यांनी शेती विभागाचे कर्मचारी श्री.हरीभाऊ शेलार यांचा प्रामाणिकपणाबद्दल भरभरून कौतुक करून सत्कार केला.
यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, शेती विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!