कॉ. चंदुलाल शेख यांचे वृद्धापकाळाने निधन


 

स्थैर्य, सातारा, दि. ०३ : सातारा येथील जुन्या काळातील सामाजिक कार्यकर्ते व पुरोगामी विचाराचे खंदे समर्थक असलेले भाई कॉ. चंदुलाल रसूल शेख उर्फ भाई कॉ चांद शेख ( वय ९१) यांचे नुकतेच पॅरालिसीस अटॅक आल्याने सातारा येथे निधन झाले. 

 

त्यांच्या मागे पत्नी ,चार मुले , सुना नातवंडे असा परिवार आहे.  कर्मवीर भाऊराव पाटील तंत्रनिकेतन सातारचे डॉ परंपरा करिम शेख तसेच सातारा एज्युकेशन सोसायटीच्या लिंगवेस्टिक अकादमीचे माजी संचालक प्रथा नीसार शेख यांचे ते वडील होत.

ज्येष्ठ साहित्यिक प्र के अत्रे यांच्या गाडीचे ते चालक होते. दैनिक मराठा साठी  साहित्यिक ग ल ठोकळ यांच्याकडूनही ते लिखाण आणण्यासाठी त्यांच्या घरी नेहमी जात. लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांचे ते रूममेट होते. लोकशाहीर कॉ.अण्णा भाऊ साठे व शाहीर अमरशेख यांच्या समवेत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहिरीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवला होता. शाहीर अमर शेख यांच्याबरोबर त्यांनी काही गीतेही गायली होती. कॉ. चंदुलाल रसूल शेख यांनी काही कवनेही लिहिली आहेत.

व्ही. शांताराम , कैफी आझमी उर्फ बाबा आझमी तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासमवेत त्यांनी काम केले आहे परंतु या या बद्दल ते नेहमीच आपण काम केले काही उपकार केले नाहीत या भावनेने ते भाष्य करीत असत.

ते मूळचे सातारा जिल्ह्यातील औंध येथील रहिवासी होते. 

मुंबई सोडल्यानंतर त्यांनी सातारा येथे एस.टी महामंडळात चालकाची नोकरी स्वीकारली व तेथे इंटक या कामगार संघटनेत त्यांनी काम केले. एसटीतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी कॉम्रेड व्ही.एन.पाटील व कॉम्रेड बळवंत गोहाड यांच्या नेतृत्वाखालील साताराच्या  लाल बावटा युनियनच्या कार्यात सहभाग घेतला. सातत्याने डाव्या व पुरोगामी चळवळीच्या बरोबर ते सक्रिय राहिले. आर्थिक विषयावर ते नेहमीच खुल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात लिहीत राहिले व बोलत राहिले.

कुराणचा एक अभ्यासक म्हणून ते स्वतःला मानीत. वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी अरेबिक भाषा शिकली व त्यातील बारकावे ,व्याकरण हे महत्त्वाचे मानले. त्यांना वाचनाचा व्यासंग दांडगा होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!