
थेट WhatsApp वर मिळवा
दूरसंचार क्षेत्रात महत्त्वाचा बदल घडवून आणत येत्या १ नोव्हेंबरपासून देशात ‘सीनॅप’ (CNAP) म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन प्रणाली लागू करण्यात येत असून, यामुळे मोबाईल स्क्रीनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव दिसणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १६ ऑक्टोबर : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशात डिजिटल सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि बनावट कॉल्स तसेच फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नवीन पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून १ नोव्हेंबरपासून ‘सीनॅप’ नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रणालीमुळे मोबाईल वापरकर्त्यांना इनकमिंग कॉल येताच फोन करणाऱ्याचे अधिकृत नाव स्क्रीनवर दिसणार आहे.
फसवणुकीच्या घटनांना बसणार आळा
सध्या नागरिकांना येणाऱ्या फ्रॉड आणि स्पॅम कॉल्समुळे मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. या नवीन नियमांमुळे युजर्सची सायबर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांपासून बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. ग्राहकांना सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण मिळवून देण्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, टेलिकॉम कंपन्यांनी या प्रणालीच्या तयारीला वेग दिला आहे.





