
दैनिक स्थैर्य । 22 मे 2025। सातारा । केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकायनि भारत सरकारच्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन कार्पोरेशनने भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे नऊ ते 14 जूनच्या पहाटेपर्यंत पाच दिवसांचा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट (परिक्रमा) पर्यटन व ऐतिहासिक ज्ञान ग्रहण उपक्रम सुरू होत आहे. या उपक्रमाचा जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन नवीन ऊर्जा प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात उदयनराजे यांनी म्हटले, की छत्रपतींच्या धगधगत्या इतिहासामधून युवापिढीला ऊर्जा, प्रेरणा मिळावी या उद्देशाने, बुद्ध सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किट, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई आणि दिल्ली येथे स्मारक, शासनमान्य इतिहास प्रसिद्ध करणे, बदनामी प्रतिबंधक कठोर कायदा करणे आदींबाबत पाठपुरावा सुरू आहे.
भारत गौरव ट्रेनद्वारे प्रवास करणार्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मापासून स्वराज्याचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंतच्या जीवनकार्यात रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील ज्या ठिकाणी ऐतिहासिक अतिमहत्त्वाच्या घटना घडल्या त्या ठिकाणांना भेटी देता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून नऊ जूनला सकाळी साडेसहा वाजता सुटणारी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन दादर-मुंबई आणि ठाणे या ठिकाणी थांबून कोकण रेल्वेने माणगाव- व तेथून किल्ले रायगड दर्शन झाल्यावर पुणे येथे पहिल्या दिवसाचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर दहा जूनला लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी पाहिल्यावर दुसरा मुक्काम पुणे येथेच असणार आहे. 11 जूनला किल्ले शिवनेरी, तसेच 12जूनला ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन व तिसरा मुक्काम पुण्यात असणार आहे. 12 जूनला सातारा येथे गौरव ट्रेन येणार आहे. किल्ले प्रतापगड दर्शन केल्यावर शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरकडे ही ट्रेन जाईल.
चौथ्या दिवसाचा मुक्काम कोल्हापूरकडे जाणार्या प्रवासात असणार आहे. 13 जूनला श्री महालक्ष्मी मंदिर दर्शन आणि किल्ले पन्हाळा दर्शन करून रात्री आठ वाजता ही ट्रेन मुंबईकडे परतणार आहे. पाचवा मुक्काम कोल्हापूर ते मुंबई या रेल्वे प्रवासातच असेल. 14 जूनला रोजी पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन परतणार आहे.