‘चिनूक’ने दाखवली शक्तीची चुणूक!


 

स्थैर्य, केदारनाथ, दि.१८: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या चिनूक हेलिकॉप्टरने पुन्हा एकदा आपल्या शक्तीची चुणूक दाखवली आहे. जगातले सर्वात ताकदवान चॉपर मानल्या जाणा-या चिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले आहे.

२०१८ मध्ये केदारनाथमधील हेलिपॅडजवळ एका खांबाला आदळून हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघातात लागलेल्या आगीत हे हेलिकॉप्टर जळाले होते. दरदम्यान, या हेलिकॉप्टरचा सांगाडा घटनास्थळावरच होता. अखेर दोन वर्षांनंतर चिनूकच्या मदतीने या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा सांगाडा उचलून नेण्यात यश मिळाले आहे. दरम्यान, चिनूक हेलिकॉप्टर एमआय-१७ हेलिकॉप्टरचा सांगाडा उचलून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून या हेलिकॉप्टरच्या शक्तीची कल्पना येऊ शकते.

सप्टेंबर 2015मध्ये भारताची बोइंग आणि अमेरिकी सरकारबरोबर 15 चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासंदर्भात करार झाला होता. त्यानंतर ऑगस्ट 2017ला संरक्षण मंत्रालयानं अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि 15 चिनूक मालवाहू हेलिकॉप्टरसह शस्त्रास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी अमेरिकेला 4168 कोटी रुपये देण्यास मंजुरीही दिली होती. अमेरिकेचे सैन्य दीर्घकाळापासून अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. दोन्ही हेलिकॉप्टरचा वापर कित्येक देश करतात. दरम्यान, दीड वर्षापूर्वी भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून या हेलिकॉप्टरचा वापर भारतीय हवाई दलाकडून उत्तर सीमेवर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!