दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२३ । फलटण । ‘‘बाल साहित्याची सुरुवात खरंतर प्रत्येकाच्या घरा-घरातून आई, आजी यांच्यापासून होते. अंगाई गीते, बडबड गीते यांपासूनच लहान मुलांच्या साहित्याचा शुभारंभ होतो. बाल साहित्याने लहान मुलांचा आनंद वाढतो, घरही आनंदी होते. ही प्रक्रिया निरंतर चालू राहण्यासाठी मुलांना आवडेल असे सोप्या मराठी भाषेतील बालकथा, कविता असलेले आणि मुलांची जिज्ञासा वाढेल असे बालसाहित्य मोठ्या प्रमाणावर लिहिण्याची आज आवश्यकता आहे,’’ अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत व महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात ‘बालसाहित्य नवलेखक कार्यशाळा’ संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन रवींद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके) होते. व्यासपीठावर म.सा.प. फलटण शाखेचे माजी अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, ज्येष्ठ सदस्य प्रा.विक्रम आपटे, प्रा.डॉ.अशोक शिंदे, नामदेवराव सूर्यवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय जाधव, प्रा.डॉ. दीपक राऊत, मसाप शाखा कार्यवाह अमर शेंडे, ताराचंद्र आवळे, प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. रवींद्र कोकरे, प्रा.डॉ.आशिष जाधव आदी उपस्थिती होते.
विद्यार्थ्यांची हस्तलिखित मासिके निर्माण व्हावीत : डॉ.सचिन सूर्यवंशी
‘‘नवलेखकांसाठी अशा कार्यशाळेची आवश्यकता असून महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने याबाबत घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे,’’ असे नमूद करुन अध्यक्षीय भाषणात डॉ.सचिन सूर्यवंशी म्हणाले, ‘‘शाळांमधून प्रत्येक वर्गाची हस्तलिखित मासिके झाली पाहिजेत. त्यातून मुलं लिहीती होतात. आपल्या भावना व्यक्त करतात. या लिहितेपणामध्ये शिक्षकांनी त्यांना बालसाहित्या बाबत मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबरच, शिक्षक, प्राध्यापक यांनीही आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी लिहिणे आवश्यक असून यातूनच साहित्यिक घडू शकतात’’.
जीवनशिक्षण व प्रबोधनात्मक बालसाहित्य निर्माण व्हावे : प्राचार्य शांताराम आवटे
प्राचार्य शांताराम आवटे यांनी बाल साहित्याची आवश्यकता स्पष्ट करून सांगितले की, ‘‘लहान मुलं वाचताना रमून जातील असे बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे. अद्भुतरम्य कथा, जादू, राजकुमार, राक्षस यांच्या कथांतून बालसाहित्य बाहेर पडले पाहिजे. याचबरोबर लहान मुलांना साहस, क्रीडा, विज्ञान कथा यातून जीवनशिक्षण व प्रबोधन होईल असे बालसाहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण होणे गरजेचे असून यासाठी अशा कार्यशाळांची आवश्यकता आहे.’’
महादेवराव गुंजवटे यांनी कार्यशाळेची माहिती देऊन प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.
…अन्यथा मुले भावनिक एकाकीपण जगतील : प्रा.डॉ.अशोक शिंदे
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘बालसाहित्याची आवश्यकता’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ.अशोक शिंदे यांनी, लहान मुलांसाठी घराघरात असलेली पूर्वीची व 1970 नंतरची बदलती जीवनशैली स्पष्ट करून ‘‘सध्या लहान मुले एका अर्थाने आधुनिकतेच्या अतिरेकीपणामुळे साधने असून सुद्धा एकाकी पडत असल्याची’’, खंत व्यक्त केली. ‘‘दूरदर्शन वाहिन्या, चलभाष, संगणक इत्यादींमुळे मुले रमू लागली पण या भांसमान दृश्यांमध्ये आजी-आजोबा, आई-वडील यांची भावनिकता मुलांना मिळत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक मुलांच्या प्रतिमेचा विकास होण्यासाठी बालसाहित्याचे वाचन त्यांच्याकडून करून घेण्याची आवश्यकता घरातील थोरा मोठ्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यातून त्यांचे बालविश्व व भावविश्व समृद्ध होईल. हे नाही झाले तर मुले भावनिक एकाकीपण जगतील’’, असेही प्रा.डॉ.शिंदे यांनी अधोरेखित केले.
पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्रा.डॉ. दीपक राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ‘‘बालसाहित्यामुळे मानवी समूहाच्या विकासाची प्रतिमा घराघरातून सुरू होत असते म्हणून बालसाहित्यामुळे लहान मुलांचे भावविश्व समृद्ध होणे गरजेचे आहे. ‘श्यामची आई’ हे पुस्तक मराठी बालसाहित्यातील अद्भुत लेणे आहे. असे साहित्य मुलांना प्रबोधनासाठी उपयुक्त ठरते.’’
बालविश्व समृद्ध करणार्या बालसाहित्याची आज गरज : ताराचंद्र आवळे
कार्यशाळेच्या दुसर्या सत्रात ‘बालसाहित्यातील कवितेचे योगदान’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शन करताना सुप्रसिद्ध कवी ताराचंद्र म्हणाले, ‘‘आईच्या कुशीत लडिवाळपणे गुणगुणले जाणारे ‘अलगुड मलगुड’, ‘चांदोबा चांदोबा भागलास कां’, ‘निज रे माझ्या बाळा’ अशी गीते बाल साहित्याचा अजरामर ठेवा आहेत. त्यातील लय, माधुर्य, ताल, नाद व मायेच्या ओलाव्याचा स्पर्श यामुळे लहान मुलांवर त्या वयापासूनच गारुड निर्माण होतं. सध्याच्या आधुनिक युगात अशी गीते, असा स्पर्श घराघरातून लुप्त झाला आहे. समाजजीवन व गृहजीवन आनंदी राहायचे असेल तर लहान मुले आनंदी असायला हवीत आणि त्यासाठी बालविश्व समृद्ध करणार्या बालसाहित्याची आज आवश्यकता आहे’’.
दुसर्या सत्राच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. विक्रम आपटे म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या मनात साहित्य बीज असते, तसेच मुलांच्या मनातही ते असतेच पण त्यासाठी प्रत्येकाने जमेल तसे व्यक्त होऊन आपल्या मनात असेल ते लिहिले पाहिजे. लिहिलेले पुन्हा पुन्हा तपासले पाहिजे त्यातून चांगले साहित्य निर्माण होऊ शकते.’’
कार्यशाळेचा उपक्रम नवलेखकांसाठी प्रेरणादायी : प्रा.रवींद्र कोकरे
कार्यशाळेचा समारोप प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. रवींद्र कोकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी नवलेखकांचे मनापासून स्वागत करून प्राध्यापक कोकरे म्हणाले, ‘‘प्रतिभा तुमच्या मनात आहे. पण ती शब्दातून बाहेर काढून कागदावर आणली पाहिजे. त्यासाठी लेखणी हाती घ्या व लिहिते व्हा. लक्षात ठेवा क्रांती लेखणीनेच होते. पण त्यासाठी बालसाहित्य लिहिणार्यांनी वाचले पाहिजे कारण; वाचनाने लिखाणाची शब्द संस्कृती ही वाढते. आज सगळीकडे मंदिरातल्या रांगा वाढत आहेत पण समाज समृद्ध व्हायचा असेल तर वाचनालयात पुस्तके वाचण्यासाठी रांगा वाढल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा हा साहित्य नवलेखांच्या कार्यशाळेचा उपक्रम अभिनंदनीय आहे. यातून निश्चितपणे नवलेखकांना लिहिण्याची प्रेरणा मिळेल.’’
कार्यशाळेच्या समारोपावेळी प्रसिद्ध युवा कवी अविनाश चव्हाण यांनी सादर केलेल्या ‘माझ्या शाळेला सुट्टी लागली’ या कवितेला उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. मसाप शाखा सदस्या सौ. स्नेहल तगारे यांनी कार्यशाळेतील कार्यक्रमाचा आढावा घेऊन आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन अमर शेंडे व प्रा. डॉ.दीपक राऊत यांनी केले. कार्यशाळेस विद्यार्थ्यांसह संयोजक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.