दैनिक स्थैर्य । दि. ०३ मे २०२३ । मुंबई । राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० झाली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे. त्याबद्दल आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक झाली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदींसह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या २९६७ वरून ३१६७ झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. २०२२ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आज झालेल्या बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हिटीसाठी भूमिगत ऑप्टीकल फायबर केबलचे प्रस्ताव, रस्ते प्रकल्पांचे प्रस्ताव तसेच अन्य विकास कामांच्या प्रस्तावांचा समावेश होता. आजच्या बैठकीत १९ प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळास शिफारशीसाठी सादर करण्यात आले.
यावेळी महाडाटा वेब पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या संशोधन प्रकल्पांच्या परिणामांसाठी एक प्रसार मंच म्हणून हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्या वरील संशोधन प्रकल्पांमधून भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनद्वारे पुस्तके, जर्नल लेख, तांत्रिक अहवाल, एमएससी प्रबंध, पीएचडी शोध प्रबंध, इंटर्नशिप प्रबंध आणि लोकप्रिय लेख यांचा समावेश असणार आहे.