साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, या समाजघटकासाठी विनातारण कर्ज योजना राबवणार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी शासन स्वतः केंद्राकडे शिफारस करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

चेंबूर येथील फाईन आर्टस् कल्चरल सेंटरमध्ये आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार राहुल शेवाळे,आमदार प्रकाश फातर्पेकर,सुधाकर भालेराव, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई गोपले, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे(बार्टी)चे महासंचालक धम्मज्योती गजभिये,सहसचिव दिनेश डिंगळे ,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे संचालक अनिल आहिरे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे खूप मोलाचे योगदान होते. सर्वसामान्य माणसाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. त्यांचे साहित्य व पोवाडा यातून तत्कालीन परिस्थितीचे यथार्थ प्रतिबिंब दिसते. त्यांनी अविरतपणे वंचितांसाठी काम केलेच. परंतु मराठी भाषेची पताका साता समुद्रा पलीकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या राहत्या घराचे भव्य स्मारक व्हावे यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करेल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अधिकाधिक सक्षम करून या समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील. उच्च शिक्षणासाठी प्राधान्याने योजना राबविण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

परिवर्तनवादी चळवळीचे अग्रदूत : उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे परिवर्तनवादी चळवळीचे अग्रदूत होते.त्यांच्या शब्दात धार होती.त्यांना सामान्य माणसाच्या वेदना माहिती होत्या. त्यांना शिकायची संधी मिळाली नाही तरीही त्यांनी लिहिलेले साहित्य हे 27 भाषांमध्ये प्रकाशित झाले. अनेक देशांत त्यांच्या साहित्यावर आधारित डॉक्टरेट् विद्यार्थ्यांनी मिळवली. त्यांच्या लिखाणात वैश्विक जाणीवा असलेली विचारधारा होती.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी सामान्य माणसांना, वंचितांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले. ‘ही पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून, श्रमिकांच्या तळ हातावर तरली आहे’ हे त्यांचे वाक्य लोकप्रिय आहे.

कुसुमताई गोपले यांनी केलेल्या मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल असे यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. वस्ताद लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशींना चालना देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेवून मातंग समाजाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

साहित्यरत्न लोकशाहीर अणा भाऊ साठे विकास महामंडळाचे संचालक अनिल आहिरे यांनी प्रास्ताविक केले.स्वागत समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी केले.

प्रवासी वाहतुकीकरिता कर्ज योजनेसाठी गौरव लोंढे यांना कर्ज योजनेचा धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील लक्ष्मी येडवे यांना शौर्य पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आभार सहसचिव दिनेश डिंगळे यांनी मानले. सूत्रसंचालन वासंती काळे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!