स्वाभिमानीचे उद्या वाठार निंबाळकर फाटा चिंचपाटी येथे चक्का जाम आंदोलन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशान्वये उद्या, दि. २२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनान्वये फलटण तालुक्यात दुपारी १२.१० वाजता वाठार निंबाळकर फाटा (चिंचपाटी) येथे हे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

याबाबत स्वाभिमानीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतकर्‍यांच्या कृषी पंपांची वीज कनेक्शन तोडणी त्वरित थांबवावी. उसाला एक रकमी एफआरआर द्यावा. सदोष कृषीपंपांची वीजबिले दुरूस्त करून मिळावीत. वीजदर नियामक आयोगात सूचविलेली ३७ टक्के दरवाढ रद्द करावी. शेतीला दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा. ऊस तोडणीसाठी ५ ते १० हजार रुपये मागणी करणार्‍या मुकादमावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात फलटण तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे, फलटण तालुकाध्यक्ष नितीय यादव, युवा आघाडी अध्यक्ष प्रमोद गाडे, पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर, फलटण पक्ष उपाध्यक्ष शकील मणेर, सोमंथळी शाखाध्यक्ष बाळासाहेब शिपकुले, कार्यकर्ते प्रल्हाद अहिवळे, शिवाजी सोडमिसे, निखिल नाळे, शशिकांत नाळे, नारायण अभंग, किसन शिंदे, पिंटू भापकर, राहुल कदम यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!