साखळी उपोषण कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगीत


 

स्थैर्य, फलटण, दि.२९ : श्रीराम सहकारी साखर कारखाना व नीरा व्हॅली डिस्टीलरी मधील सेवानिवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युईटी व थकीत पगाराच्या रक्कमा मिळण्यासाठी दि. 9 नोव्हेंबर पासून येथील अधिकार गृह इमारतीसमोर फलटण तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून सुरु असलेले साखळी उपोषण कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगीत करण्यात आले आहे. 

श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्कशाळेतील सन 2017 ते 2020 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 150 कामगारांची ग्रॅच्युईटी, थकीत पगार व अन्य सुमारे 4 कोटी 67 लाख रुपयांची येणी प्रलंबीत असून नियमानुसार कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर रक्कमा त्यांना मिळणे अपेक्षीत आहे, मात्र कारखाना आर्थिक गर्तेत रुतल्याने अन्य व्यवस्थापनामार्फत चालवून त्याला पूर्ववैभवाप्रत नेण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नातून आज कारखान्याची स्थिती सुधारत असताना काही आर्थिक अडचणी दूर करण्यास उशीर झाल्याने हा प्रश्‍न निर्माण झाल्याचे दोन्ही बाजूच्या चर्चेतून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले व प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर कारखाना व्यवस्थापन कामगारांची सदर देणी देण्यासाठी आर्थिक तरतुदी करुन निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याबाबत कारखाना व्यवस्थापन व फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार सन 2020 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युएटी व इतर थकीत रक्कम माहे फेब्रुवारी 2021 अखेर अदा करण्याबाबत सहमती देण्यात आल्याने सदरचे साखळी उपोषण स्थगीत करण्यात आले आहे. या चर्चेत कामगारांच्यावतीने अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्यासमवेत अशोकराव रणवरे, रवी फडतरे वगैरेंनी सहभाग घेतला होता. 

सदर साखळी उपोषणा दरम्यान कामगार व कारखाना व्यवस्थापन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने कारखाना व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये एकमत होवून सदरचा प्रश्‍न 21 दिवसाच्या साखळी उपोषणानंतर स्थगीत करण्यात यश आले असल्याचे स्पष्ट करीत कारखाना व्यवस्थापनाने लेखी आश्‍वासन दिल्यामुळे सदरचे आंदोलन स्थगीत करण्यात आले असल्याचे अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी सांगितले. 

फलटण तालुका संघर्ष समिती व कामगारांना कारखान्याच्यावतीने लेखी आश्‍वासन देताना कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन शाहुराज भोसले, अ‍ॅड. नरसिंह निकम, रवी फडतरे, नगरसेवक अशोकराव जाधव, राजेंद्र नागटीळे, अशोककाका पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक रावळ आणि कामगार उपस्थित होते. 

आंदोलना दरम्यान भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आय, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय, शेतकरी संघटना वगैरे राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठींबा व्यक्त केला. तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांनी केलेल्या सहकार्याबद्दल अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी आभार व्यक्त केले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!