सर्व्हिस इंजिनीयर फोरम बारामतीच्या वतीने ‘अभियंता दिन’ साजरा


दैनिक स्थैर्य | दि. १८ सप्टेंबर २०२३ | बारामती |
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिन १५ सप्टेंबर ‘अभियंता दिन’ म्हणून सर्व देशात साजरा करण्यात येतो. बारामतीच्या पाटबंधारे खात्यातील अभियंत्यांनी स्थापन केलेल्या ‘सर्व्हिस इंजिनिअर्स फोरम, बारामती’तर्फे हा ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी इंजिनीयर बबनराव संग्रामपूरकर, दिलीप भिसे यांनी वयाचा ‘अमृत महोत्सव’ साजरा केल्याबद्दल इंजि. महेश रोकडे, मुख्य अधिकारी, बारामती नगरपालिका यांचा नगरपालिकेस स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशांमधून व माझी वसुंधरा अंतर्गत राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवून देण्यात मार्गदर्शन केल्याबद्दल, पुरस्कार देऊन सन्मानित केले तर इंजि. हेमचंद्र शिंदे यांनी ‘प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक’ म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षाच्या यशस्वी योगदानाबद्दल ‘करिअर महागुरू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘विषमुक्त शेती’ संशोधन आणि प्रचार करून बारामतीकरांना विषमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देत असल्याबद्दल इंजि. गोरख सावंत यांना सन्मानित करण्यात आले.

नीरा डावा कालव्यात वाहून जाणार्‍या युवकाचा जीव वाचवल्याबद्दल इंजि. छगन लोणकर यांना ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कुमारी मधुरा रवींद्र पाटकर हिस आयआयएसइआर भोपाळ येथून स्तनाचे कर्करोगावर संशोधन करून पीएचडी प्राप्त केल्याबद्दल गौरवण्यात आले.

अभियंता प्रदीप वाळुंजकर यांनी ‘ध्यान आणि साधना’ या विषयावर व इंजि. दीपक पांढरे यांनी ‘देशाची- राज्याची उपयुक्त जलसंपदा व भविष्यातील वाटचाल’ या विषयावर व्याख्यान दिले.

फोरमचे अध्यक्ष अजित जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच प्रदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!