‘कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा; 24 ते 25 कोटी जनतेला लसीकरण करायची गरज ‘- उद्धव ठाकरे

स्थैर्य, मुंबई, दि.२२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( दि. 22) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येणाऱ्या कार्तिकी वारीला गर्दी न करण्याचे आवाहन केले. आपल्या संवादात उद्धव ठाकरेंनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा, सोशल डिस्टन्सिंगचे, मास्क न घालणे यांसह विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सर्व धर्मांचे प्रार्थनास्थळे उघडली. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोना अजून गेला नाही. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. 24-25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावे लागणार आहे. यासोबतच, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे हे त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार आहे.
ठाकरे पुढे म्हणाले की, ‘अनेकजण मास्क न घालता फिरत आहे, गर्दी करत आहेत. आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. उद्या मुले आजारी पडू नये याची काळजी आहे. काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का?’ असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
उद्धव ठाकरेंच्या संवादातील प्रमुख मुद्दे
- कार्तिकी वारीला गर्दी करु नका.
- सर्व सण संयमाने साजरे केले.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना जास्त घातक आहे.
- 24 ते 25 कोटी जनतेला लसीकरण करायची गरज आहे.
- लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही,
- मास्क घाला, हात धुवा हे त्रिसूही उपाय आपल्या हातात आहेत.
- जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर जबाबदारी नाही.
- अनावश्यक घराबाहेर पडू नका, करोनाची लक्षण दिसली तर लगेच चाचणी करा.
- सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका
- गर्दी वाढली तरी कोरोना मरणार नाही वाढणार आहे.
- उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजा कुठेही गर्दी न करता साजरा केली.
- सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला करोनाचा आकडा खाली आला.
- दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे.
- परदेशात लॉकडाऊन करण्यात आला.