हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अवधूत गुळवणी यांना ‘परशूराम पुरस्कार’ प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२४ | फलटण |
अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था फलटण केंद्रातर्फे देण्यात येणारा ‘परशुराम पुरस्कार’ सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अवधूत गुळवणी यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कुंदनकुमार साठे यांनी आपल्या भाषणात डॉ. गुळवणी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. गोंदवलेकर महाराज संस्थानमध्ये डॉ. गुळवणी दाम्पत्याचे सेवाकार्य गेली तीस वर्षे अखंडपणे सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे, असे उद्गार श्री. साठे यांनी काढले. आपल्या समाजातील समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानींचे स्मरण कायमच तरुण पिढीने ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून जनकल्याण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर देशपांडे हे उपस्थित होते. अर्थकारण आणि समाजकारण याची योग्य ती सांगड घालून व्यवसायात यशस्वी होता येते. शिक्षणक्षेत्रात आपल्या समाजातील तरुण-तरुणींनी कार्यरत राहावे, असे प्रतिपादन श्री. देशपांडे यांनी केले. डॉ. गुळवणी यांनी आपले मनोगत सादर करताना चाळीस वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.

गोंदवलेकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि फलटणकारांच्या अलोट प्रेमाने मला रुग्णसेवा करता आली, मी अत्यंत समाधानी आहे, असे म्हणत डॉ. गुळवणी सरांनी पुरस्कार दिल्याबद्दल अखिल ब्राह्मण संस्था फलटणचे आभार मानले.

प्रास्ताविक श्री. नंदकुमार केसकर यांनी केले. डॉ. गुळवणी यांचा परिचय निखिल केसकर यांनी केला. श्री. साठे आणि श्री. देशपांडे यांचा परिचय अनुक्रमे नितीन लाटकर व सचिन कुलकर्णी यांनी केला. मंत्रपठण श्री. जयदीप देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. दत्तात्रय चरेगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. विजय कुलकर्णी यांनी केले. यावेळी फलटणमधील नागरिक बंधू-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!