उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण दि.२४: ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नामनिर्देशन पत्रासोबत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, मत्ता व दायित्य, अपत्याचे घोषणापत्र नोटरी करुन सादर करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारी अर्ज करण्यास 23 डिसेंबरपासून सुरवात झाली असून, 30 डिसेंबर (दुपारी तीनपर्यंत) ही शेवटची मुदत आहे. मात्र, 25 ते 27 या काळात सार्वजनिक सुट्या असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवसच मिळणार आहेत. 

निवडणूकी संदर्भात अधिक माहिती देताना तहसिलदार समीर यादव यांनी कळविले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सात व नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 25 हजारांची मर्यादा ठरवून दिली आहे. तर 11 ते 13 उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतीतील प्रत्येक सदस्याला निवडणूक कालावधीत 35 हजारांचा खर्च करता येईल, असेही निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहे. 15 ते 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना 50 हजारांपर्यंत खर्च करता येणार आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील (एससी) उमेदवारास प्रत्येकी शंभर रुपयांचे डिपॉझिट द्यावे लागणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठीही शंभर रुपयेच अनामत रक्कम असून सर्वसाधारण तथा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. 

जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रकिया 1 ऑगस्टपासून झाली ऑनलाइन झाली आहे. एक खिडकी योजनेतून घ्यावा जात पडताळणी अर्ज; समितीला पडताळणीसाठी द्यावा लागणारा अर्ज तहसील कार्यालयाकडून घ्यावा. जात पडताळणी समिती कार्यालयास दिलेले पत्र, जात पडताळणीसाठी दिलेली कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावीत. उमेदवाराने ऑनलाइन जात पडताळणी प्रस्तावाची प्रत, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींसह पडताळणी कार्यालयास द्यावीत. जात पडताळणीच्या प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती व वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिन्यांत द्यावे लागणार आहे. एक व्यक्ती तथा उमेदवार एका प्रभागातून एकच अर्ज करू शकेल; एका प्रभागातून अधिकाधिक चार उमेदवारी अर्ज भरता येईल. एका प्रभागात भरलेल्या अर्जांतून एक अर्ज वैध धरला जाईल; एक जरी अर्ज उमेदवाराने मागे घेतला तर त्या प्रभागातून संबंधिताने माघार घेतली असे समजले जाईल. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर उमेदवाराने हमीपत्र व घोषणापत्र निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे द्यावे. निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करीत असल्याचे हमीपत्र, अपत्यांबाबतचे घोषणापत्र, शौचालयाचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र, अनामत रकमेची पावतीही बंधनकारक  आहे. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार व ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व बँक पासबुक (राष्ट्रीयकृत तथा शेड्यूल बँक) द्यावे. एका प्रभागात एक चिन्ह वाटप झाल्यानंतर तेच चिन्ह त्याच प्रभागातील दुसर्‍या उमेदवाराला मिळणार नाही; 190 मुक्त चिन्हांपैकी एक उमेदवार पाच चिन्हे  निवडू शकतो असेही तहसीलदार समीर यादव यांनी संगितले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!