
थेट WhatsApp वर मिळवा
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत आणि ई-केवायसी प्रक्रियेबाबत केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. १० ऑक्टोबर : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत ३ समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात वर्ग केली जाते. दरम्यान, सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये पुढील हप्त्यात ४ हजार रुपये मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, प्रलंबित हप्ते आणि ई-केवायसी (e-KYC) पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनाच थकित रक्कमेसह लाभ मिळणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हप्त्याची स्थिती अशी तपासा
शेतकऱ्यांना आपल्या खात्यात हप्ता जमा होणार की नाही, हे तपासण्यासाठी ‘पीएम किसान’च्या अधिकृत संकेतस्थळावर (pmkisan.gov.in) सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील ‘Farmers Corner’ या पर्यायामध्ये जाऊन ‘Beneficiary Status’ वर क्लिक केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून हप्त्याची ताजी स्थिती पाहता येईल. खात्याची माहिती आणि पेमेंट स्टेटस सक्रिय (Active) असणे आवश्यक आहे.
ई-केवायसी आणि बँक खाते आधार सीडिंग अनिवार्य
ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण नाही किंवा बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले (Aadhaar Seeding) नाही, अशा शेतकऱ्यांचे हप्ते रोखण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांनी तातडीने ओटीपीद्वारे किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





