
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । फलटण । दुधेबावी येथे पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 4 घरांचे काम सुरू असून 4 घरांच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे व 2 घरांचे काम कागदपत्रांअभावी सुरू करण्याचे राहिले आहे. ते येत्या दोन – चार दिवसांमध्ये सुरू होईल . त्यामुळे दुधेबावी ग्रामपंचायतीस या आर्थिक वर्षात असलेले उद्दिष्ट 31 मार्च 2023 अखेर पूर्ण करणार व या आर्थिक वर्षातील सर्व निधी 31मार्च 2023 अखेर खर्च करणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त सरपंच सौ. भावना सोनवलकर यांनी केले.
यावेळी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व प्रशासक डॉ. अमिता गावडे – पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जगताप तसेच दुधेबावी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नाळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी आढावा घेतला त्यामध्ये त्या म्हणाल्या की, फलटण तालुक्यामध्ये एकूण 8115 घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत. त्यापैकी 3106 लाभार्थ्यांना मंजुरी दिली आहे. त्यामधील 1882 लाभार्थ्यांनी घरे बांधून पूर्ण केली आहेत .उर्वरित 1224 लाभार्थ्यांपैकी 594 घरे प्रलंबित आहेत तर 630 लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तालुकास्तरावरून घरांसाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देणे किंवा खाजगी जागा खरेदी करण्यासाठी सहाय्यक अनुदान देण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असून या आर्थिक वर्षात फलटण तालुक्यासाठी घरकुल योजनेचे जे काय उद्दिष्ट आहे ते 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, सर्व कर्मचारी, डेटा ऑपरेटर, तसेच रोजगार सेवक व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.