
थेट WhatsApp वर मिळवा
बीव्हीजी इंडिया लिमिटेडने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपये दिले; मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द.
स्थैर्य, मुंबई, दि. 26 नोव्हेंबर : नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या काळात गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीव्हीजीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांच्याकडून हा धनादेश स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.
आवाहनाला प्रतिसाद आणि सामाजिक बांधिलकी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारण आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बीव्हीजीने एक कोटी रुपयांचे योगदान दिले असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटीची स्थापना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि संकटांमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक व आवश्यक मदत उपलब्ध करून देणे, तसेच कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सीएसआर निधी, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून मदतीचा हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे.
बीव्हीजी समूहाचे कार्य आणि सीएसआर सहकार्य
बीव्हीजी समूह स्वच्छता, औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया, शेती विकास, सेंद्रिय शेती, महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. महाराष्ट्रात समूहाकडून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अर्थात १०८ रुग्णवाहिका सेवेचे संचालनही केले जाते आणि गेल्या १२ वर्षांपासून ही सेवा राज्यात अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या वतीने सीएसआरअंतर्गत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांना आतापर्यंत एकूण एक कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले असून, समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची ही परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा समूहाचा प्रयत्न आहे. अधिक माहितीसाठी विशाल केदारी यांच्याशी 8830 590 413 किंवा 7719860058 या क्रमांकांवर संपर्क साधावा.



