ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांचे निधन


                                             

स्थैर्य,अकोला, दि ३० : ज्येष्ठ रंगकर्मी, रत्नागिरी येथे झालेल्या नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, रंगभूमी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व अकोला भूषण राम जाधव यांचे आज दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्राचा चालता, बोलता विश्वकोष हरविला असून मागील ५ दशकांपासून अकोल्याची नाट्य चळवळ प्रभावित ठेवणाऱ्या या जातीवंत कलावंताने जीवनाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली आहे. मृत्यसमयी मामांचे वय ८७ वर्ष होते.

अगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान -मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. नंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच रंगभूमीच्या चरणी बहाल केले. रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांची भूमिका वठविणे सुरूच होते. प्रायोगिक रंगभूमीला सन्मान मिळवून देण्याचे काम मामांनी केले. रंगभूमीला व्यवसाय न मानता पूजा मानणारे मामा होते.

मामांनी अभिनया सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली. मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. २०११ मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद राम जाधव यांनी भूषविले. हा अकोलेकरांसाठी फार मोठा सन्मान होता. जीवनभर सतत नाटक आणि नाटक हाच ध्यास घेतलेला हा कलावंत गेल्याने अकोल्याच्या नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अकोल्यात सुसज्ज नाट्यगृह असावे हे मामांचे स्वप्न होते. ते अधुरे राहिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!