कोरोनाबाधितांसाठी शिक्षक, पदवीधर निवडणुकीत मतदानाची ठरली वेळ


 

स्थैर्य,सातारा,दि ३० : शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यात 176 मतदान केंद्रे आहेत. यामधील शिक्षकसाठी 44, तर पदवीधरसाठी 132 केंद्र असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आरोग्य विभागाचे एकूण 201 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येथे दिली.

श्री. सिंह म्हणाले, “”मतदानाची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. या निवडणुकीत शिक्षकसाठी 62, तर पदवीधरसाठी 35 उमेदवार उभे आहेत. पदवीधरसाठी 39,440 पुरुष, तर 19,630 स्त्री मतदार असून, शिक्षकसाठी 5121 पुरुष मतदार, तर 2589 स्त्री मतदारांनी नोंदणी केली आहे. या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण झाले आहेत. निवडणुकीसाठी 51 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मायक्रोऑबर्झवरसाठी 231 अधिकारी राहणार आहेत. दरम्यान, शिक्षक मतदार यादीत शिक्षक नसतानाही अवैध कागदपत्रे देऊन नोंदणी केल्याचे आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे, तसेच मतदानासाठी आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड ग्राह्य धरली जाणार आहेत.”

कोरोनाबाधितांनाही मतदानाचा हक्क

शिक्षक व पदवीधर निवडणुकीत कोरोनाबाधित रुग्णांनाही मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. यासाठी सर्व सुरक्षितता घेतली जाणार असून, कोविड बाधित मतदारांसाठी शेवटचा एक तासाचा कालावधी मतदानासाठी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!