ट्रॅक्टर व रोख रक्कम घेऊन ऊसतोड मुकादम पळाला


 

स्थैर्य, नागठाणे, दि.७ : ऊसतोड कामगार आणतो असे सांगून वेणेगाव (ता.सातारा) येथील दोन शेतकऱ्यांकडून ५.९८ लाख रुपये घेऊन व त्यांचाच ट्रॅक्टर घेऊन ऊसतोड मुकादमाने पोबारा केल्याची घटना घडली आहे.याची फिर्याद सुनील बाळासाहेब घोरपडे(वय.५०,रा वेणेगाव,ता.सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी ऊसतोड मुकादम रामेश्वर मगन गोरड ( रा.दगडी शहाजानपूर,ता.जि. बीड) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील घोरपडे यांचा ऊसतोडणी वहातुक व्यवसाय असून त्यांचा खटाव मान एग्रो प्रोसेसिंग प्रा.ली.पडळ साखर कारखान्याशी करार आहे.उसतोडी संदर्भातून त्यांचा रामेश्वर मगन गोरड या ऊसतोड मुकादमाशी ७ ते ८ वर्षांपासून ओळख आहे.

काही दिवसांपूर्वी रामेश्वर गोरड याने सुनील घोरपडे यांच्याकडून ‘बीड येथून उसतोडणीसाठी कामगार आणतो’ असे सांगून त्यांच्याकडून २.८५ लाख रुपये तसेच गावातीलच सुनील घोरपडेचा मित्र महेश युवराज ताटे यांच्याकडून ३.१३ लाख रुपये असे एकूण ५.९८ लाख रुपये घेतले.यावेळी कामगार आणण्यासाठी सुनील घोरपडे यांचा हिंदुस्थान कंपनीचा ट्रॅक्टरही घेऊन गेला.मात्र १५ दिवस उलटूनही तो न आल्याने सुनील घोरपडे यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने कामगार घेऊन ३- ४ दिवसात येतो असे सांगितले.त्यानंतर त्याचा मोबाईल नंबरही बंद झाला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सोमवारी सुनील घोरपडे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत रामेश्वर गोरड या ऊसतोड मुकादमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!