उदयनराजेंचे ‘हे’ म्हणणे हास्यास्पद; शशिकांत शिंदेंचा टाेला


 

स्थैर्य, सातारा, दि.१: खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून राज्य सरकारवर प्रत्यक्षपणे, तर शरद पवारांसह माजी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदेंनी जाेरदार प्रत्युत्तर दिले.

शिंदे म्हणाले, “”मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वपक्षीयांची भावना आहे. मात्र, लोकांमध्ये बुद्धिभेद करून समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले हे राज्य सरकारवर आरोप करत आहेत. वास्तविक, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. न्यायालयातही भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असेल, तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नीही सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारने सूचना कराव्यात यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा.” 

“फडणवीसांना मुख्यमंत्री करा, आरक्षणाचा प्रश्न कसा मिटवतो,’ असे उदयनराजेंचे म्हणणे हास्यास्पद आहे. मागील पाच वर्षांत फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा विषय पुढे आला. मराठा बांधवांनी एकजूट आणून सरकारवर दबाव आणला. मात्र, या पाच वर्षांत फडणवीसांना हा प्रश्न मिटवता आला नाही. शेवटी दबाव वाढल्याने फडणवीसांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही. वास्तविक मराठा आरक्षण देताना राष्ट्रपतींची मंजुरी का घेतली गेली नाही, असा प्रश्नही आमदार शिंदेंनी उपस्थित केला.

उदयनराजेंनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे, अशी सर्वांचीच मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याने ही मागणी होणे स्वाभाविकच आहे. मात्र, ते नेतृत्व का करत नाहीत, हाच प्रश्न आहे असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!