
स्थैर्य, मोरगिरी, दि.१४: पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले असताना दुसरीकडे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने आता काय करायचे? असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडलेला आहे. शिवाय पेरणीचा वेळ निघून गेली आहे. या बोगस बियाणामुळे नुकसान झालेले भात उत्पादक शेतकरी पूर्ण हताश झाल्याचे चित्र पाटण तालुक्यात दिसत आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना कोरोनामुळे फटका बसलेला आहे. त्यातच आता या बोगस बियाणांची भर पडलेली आहे. इतकी मेहनत घेऊनही बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होईलही; पण या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याचे काय? या पार्श्वभूमीवर बोगस बियाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्याने पिके कुजली आहेत. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या उडीद, मूग, सोयाबीन, भात पिकांचे पंचनामे करण्याचे काम शासनामार्फत करण्यात आले. मात्र, ऐन काढणीच्या कामात पावसाने पुन्हा पिकांचे नुकसान केल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला गेला आहे. अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या कामास मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.