दैनिक स्थैर्य | दि. १६ एप्रिल २०२४ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती फलटणच्या एसटी स्टँडवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते एसटी स्टँडपर्यंत भव्य दिव्य अशी सजावट करण्यात आली होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून मान्यवरांचे रिक्षा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडिक म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेब यांनी दिलेला कायदा कधी मोडायचा नाही. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघर्ष करा आणि वाटचाल करा’ हा मंत्र जोपासायचा आहे. नवयुवकांनी या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट आहे की, बाबासाहेबांचे आंबेडकरी विचार मूळ काय आहेत. बाबासाहेबांनी केलेला संघर्ष काय आहे, बाबासाहेब आपणा सर्वांनी वाचले पाहिजेत, बाबासाहेबांच्या विचारानेच आपण आज सर्वजण या ठिकाणी आहोत.
यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार याबाबत मनोगत व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने भव्य असा अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. या अन्नदानाचा प्रवासी बंधूसह अनेकांनी लाभ घेतला व संघटनेच्या कामाचे कौतुक केले.
याप्रसंगी फलटणचे तहसीलदार श्री. अभिजीत जाधव, श्री. सचिन धेंडे (आण्णा), फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडिक, फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत कुमार शहा, फलटण आगाराचे आगारप्रमुख श्री. रोहित नाईक, वाहतूक निरीक्षक श्री. धीरज अहिवळे, कृष्णामाई चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. जे. टी. पोळ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुकाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर, राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया सातारा जिल्हाध्यक्ष व ‘धैर्य’चे संपादक श्री. सचिन मोरे, उपजिल्हा रुग्णालय फलटणचे डॉ. सुभाष गायकवाड, डॉ. अंशुमन धुमाळ, फलटण दर्शनचे संपादक श्री. सुधीर अहिवळे, श्री. सचिन अहिवळे (माजी नगरसेवक), अॅड. प्रेम अहिवळे, अॅड. बापू लोंढे, सौ. मंगल जाधव व त्यांचे सहकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद, फलटण शहरातील सर्व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळातील सर्वांनी परिश्रम घेतले.