कोरोनाविषयी बेडची माहिती मिळणार एका क्लिकवर


 

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

स्थैर्य, सोलापूर, दि. 21 : कोरोना झाला तर सामान्य जनतेला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जावे… बेड उपलब्ध आहे का…महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आहे का…. याची माहिती नसते. मात्र आता दवाखान्याच्या नाव, फोनसह बेड उपलब्धतेची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने   www.solapur.gov.in/corona    या संकेतस्थळावर सामान्य जनतेला माहिती उपलब्ध करून दिली असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने आपल्या आधुनिक उपक्रमाद्वारे सर्व नागरिकांना दिलासा दिला आहे. ग्रामीण भागातील सर्व कोविड सेंटरमधील, सामान्य तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाटांच्या उपलब्धतेची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही माहिती नियमित दररोज अपडेट केली जात असून सध्यस्थितीत माहिती बिनचूक ठेवण्याचे आदेश सर्व कोविड सेंटर्सना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या डीसीएच, डीसीएचसीमधील अद्ययावत बेडची माहिती सामान्य जनतेसह जिल्हा प्रशासनाला पाहता येते. या संकेतस्थळाचे संपूर्ण नियंत्रण अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत हे करीत आहेत.

जनतेचा वेळ वाचणार

संकेतस्थळाच्या उपक्रमामुळे कोरोनाविषयी दवाखान्यांची, बेडच्या उपलब्धतेची माहिती सामान्य जनतेला एका छताखाली मिळणार आहे. दवाखाना शोधायला लागत नसल्यामुळे जनतेचा वेळ वाया जाणार नाही. पर्यायी दवाखान्यांची माहिती मिळाल्याने कोरोना रूग्णांवर त्वरित उपचार होणार आहेत, असेही श्री. शंभरकर यांनी स्पष्ट केले.

कसे वापराल

www.solapur.gov.in/corona या संकेतस्थळावर जावून सोलापूर जिल्हा (ग्रामीण) – कोविड रुग्णासाठी हॉस्पिटल निहाय खाटांची माहिती, यावर क्लिक केल्यास तालुकानिहाय खाटांची माहिती त्वरित मिळते. यामध्ये दवाखाना, त्यांचा संपर्क क्रमांक, पत्ता, एकूण खाटा, कोरोनासाठी खाटा, रिकाम्या खाटा यांची संपूर्ण माहिती मिळते. याशिवाय जिल्ह्यातील महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट 16 दवाखान्याची माहितीही याचपद्धतीने देण्यात आली. दररोज हे संकेतस्थळ दोनवेळा अपडेट केले जात असल्याने उपलब्ध खाटांची माहिती मिळण्यास मदत होत आहे.

आठवडाभरात ॲपद्वारेही माहिती

संकेतस्थळाव्यतिरिक्त कोरोना रूग्णालयांची आणि उपलब्ध खाटांची माहिती अजून सोईस्कररित्या मिळण्यासाठी ॲप तयार करण्यात येत आहे. आठवडाभरात आता ॲपद्वारेही माहिती जनतेला मिळणार आहे. यामुळे ॲपद्वारे आणि मोबाईलवरही माहिती सहज जनतेसाठी उपलब्ध होणार असल्याचे श्री. शंभरकर यांनी स्पष्ट केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!