निंबळकच्या कोरोना केअर सेंटरमध्ये राम निंबाळकर यांच्यावतीने बेड्स व वाफारा मशिन्सची सुविधा उपलब्ध


स्थैर्य, फलटण दि.०९ : प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांनी निंबळक (ता.फलटण) येथील कोरोना केअर सेंटरमध्ये 10 बेड आणि 20 वाफ घेण्याच्या मशिन उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या या मदतीबद्दल ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले.

निंबळक कोरोना विलगीकरण कक्षात सध्या 14 रुग्ण दाखल आहेत, आतापर्यंत रुग्णांसाठी बेड नसल्याने फरशीवर गाद्या टाकण्यात आल्या होत्या, मात्र पाऊस व बदलत्या हवामानाचा त्रास टाळण्यासाठी बेडची व्यवस्था करण्यात आली असून गरज वाटल्यास आणखी बेड उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, तथापी आता ग्रामस्थांनी प्रशासनाचे सर्व नियम, निकषांचे काटेकोर पालन केल्याने रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता कमी असून निंबळक कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली आहे.

निंबळक येथे गृह विलगीकरणात कोरोना रुग्णांना मोफत औषधे व अन्य सुविधा देण्यासाठी उद्योजक राम निंबाळकर यांनी मोठी मदत केली, तथापी केवळ निंबळक नव्हे तर संपूर्ण राज्यभर गृह विलगीकरणातील रुग्ण नियम, निकष सांभाळत नसल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाने गृह विलगीकरण बंद करुन संपूर्ण राज्यभर संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक केल्याने ग्रामस्थ, ग्रामपंचायत व उद्योजक राम निंबाळकर यांनी जिल्हा परिषद प्रा. शाळेत विलगीकरण कक्ष उभारुन रुग्णांना निवास, भोजन व वैद्यकीय उपचाराची सुविधा तेथे उपलब्ध करुन दिली.

विलगीकरण कक्ष उभारण्यात आला तरी तो पुरेसा नसल्याचे स्पष्ट होत असताना ग्रामदक्षता समिती, ग्रामपंचायत आणि प्रशासन यंत्रणेने लोक प्रबोधन, कोरोना टेस्टिंग, रुग्णावर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या त्याच वेळी ग्रामस्थांनीही कोरोना गावातून हद्दपार करण्याचा निर्धार केला आणि 350 वर पोहोचलेली बाधीतांची संख्या आज केवळ 14 पर्यंत खाली आली असून लवकरच निंबळक कोरोना मुक्त गाव होणार असल्याचा विश्‍वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

विलगीकरण कक्षातील रुग्णांची चोख व्यवस्था सरपंच राजेंद्र मदने, ग्रामसेवक सी. एम. शिंदे, पोलीस पाटील समाधान कळसकर, गोट्या चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विकास भोसले, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी प्रयत्नशील आहेत.


Back to top button
Don`t copy text!