फुलांची सुरेख आरास, सजले पंढरपूर, विठुरायाच्या दर्शनाने भाविकांचा आनंद द्विगुणीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, पंढरपूर, दि.१७: लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान
असलेल्या परमात्मा पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनास आजपासून
सुरवात झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिवाळी पाडवा, भाऊबीज या
सणाचे औचित्य साधत फुलांची आकर्षक सजावट केली. या फुलांच्या सजावटीत देवाचे
लोभस रूप भाविकांनी डोळ्यात साठवले. मंदिर समितीने आरोग्याची काळजी घेत
दर्शन व्यवस्था चांगली ठेवली आणि देवाच्या विठुरायाच्या दर्शनाने एक
सात्विक उर्जा प्राप्त झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केल्या.

राज्य सरकारने मंदिरे दर्शनासाठी खुली
करण्याच्या निर्णयाची अमलबजावणी आज झाली. १७ मार्च रोजी श्री विठ्ठल मंदिर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद ठेवले होते. त्या नंतर माघी,
चैत्री आणि आषाढी वारी भाविकाविना साजरी करण्यात आली. मात्र गेल्या
महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्यावर मंदिरे सुरु करा अशा मागणीने
जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालत मंदिरे दर्शनासाठी खुली
करण्याचा निर्णय घेतला. या बाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने बैठक
घेवून दर्शनाची व्यवस्था, नियोजन करण्यात आले. दररोज भाविकांना सकाळी ६ ते
रात्री ९ वाजे पर्यंत दर्शन देण्यात येणार आहे. श्री विठ्ठलाचे आणि
रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते. मात्र या वर निर्बंध आणीत आता
केवळ मुख दर्शन करता येणार आहे.

तसेच दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी
मंदिर समितीची www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून दर्शनाची
तारीख वेळ निश्चित करावी लागणार आहे. आणि ज्या भाविकांनी संकेतस्थळवरून
दर्शनाची वेळ घेतली आहे. त्याच भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.
तसेच भाविकांनी ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. श्री विठ्ठल रुक्मिनिमातेचे
दर्शन सकाळी ६ ते ७, ८ ते ९, १० ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १, २ ते ३, ३
ते ४, संध्यकाळी ५ ते ६, ७ ते ८ आणि ८ ते ९ या कालावधीत भाविकांना दर्शन
घेता येईल अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
मास्क, योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी शासनाच्या सूचनेचे पालन करावे
लागणार आहे. तसेच ६५ वर्षा पुढील, १० वर्षाखाली आणि गर्भवती महिलांना
दर्शनासाठी परवानगी नाही.

या सा-या पार्श्वभूमीवर आज सकाळी ६ वाजता
दर्शनास सुरवात झाली. दोन दिवसापूर्वी चेन्नई येथून रामेश्वर राव हे
सपत्नीक पंढरीत आले होते. त्यांनी काल तातडीने संकेतस्थळावरून दर्शनाचे
बुकिंग केले आणि आजचे दर्शन घेणारे पहिले भाविक ठरले. गेल्या वर्षी
दर्शनाला आलो होतो. मात्र कोरोनामुळे दर्शन घेऊ शकलो नाही. पण सुदैवाने
दर्शनासाठी मंदिरे खुली झाली आणि विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यामुळे एक
सात्विक उर्जा प्राप्त झाल्याची भावन त्यांनी व्यक्त केली. तर मंदिर
समितीने आरोग्य विषयक उपाय योजना चांगल्या ठेवल्या आहेत. पोलिसांनी मदत
करीत सहकार्य केले. खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नीने दिली.
आज पाडव्यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची आरास केली आहे. पुण्यातील संतोष
तानाजी वाळके या भाविकाने या फुलांची सजावट सेवा केल्याची माहिती मंदिर
समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. विठू माझा
लेकुरवाळा…संगे भक्तांचा मेळा या अभंगा प्रमाणे देवाला भक्ताची आणि भक्ताला
देवाची भेट आनंद द्विगुणीत करणारी ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!