कोरोनाचा समुहसंसर्ग होऊ नये याकरीता दक्ष व सतर्क रहा


 

विशेष पोलिस महानिरीक्षक व परिक्षेत्रातील सर्व पोलिस अधीक्षकांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सुचना

स्थैर्य, दौलतनगर दि.१२ : कोरोनाच्या संकटामुळे गत सहा महिन्यापासून सुरु असलेले राज्यामधील लॉकडाऊन बहूतांशी प्रमाणात उठल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.मोठमोठया शहरात लॉकडाऊन उठल्यामुळे गर्दी वाढू लागली असून आता लॉकडाऊन नाही तर आपल्याला कोण विचारणार? अशी भावना जनमानसात निर्माण झाली असून कोरोनाचा समुहसंसर्ग होऊ नये याकरीता पोलीस यंत्रणेलाच दक्ष आणि सतर्क रहावे लागणार असल्याने त्याप्रमाणे आपले विभागाचे नियोजन करावे अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व त्यांच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर,सोलापुर,पुणे,सांगली,सातारा येथील पोलिस अधीक्षकांना केल्या व पोलीस विभागातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यामुळे दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली सातारा पोलीस मुख्यालय येथून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोल्हापुर परिक्षेत्रातंर्गत कायदा व सुव्यवस्था राखणेसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक आयोजीत करण्यात आली होती. कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया,कोल्हापुरचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,सोलापुर पोलीस अधीक्षक मनोज पाटील,पुणे प्रभारी पोलीस अधीक्षक मोहिते, सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दुभाले हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सहभागी झाले होते तर सातारा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील हे सातारा पोलीस मुख्यालय याठिकाणी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रांरभी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यामध्ये बहूतांशी प्रमाणात लॉकडाऊन उठल्यानंतर कोल्हापुर परिक्षेत्रातंर्गत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर, सोलापुर, पुणे, सांगली व सातारा येथील कायदा व सुव्यवस्थासंदर्भात कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचेकडून माहिती घेतली. कोरोना काळात किती गुन्हे घडले,गंभीर स्वरुपाच्या गुन्हयावर कोणती कार्यवाही केली अशी विचारणा करीत लॉकडाऊन उठल्यानंतर मोठमोठया शहरात गर्दी वाढू लागली आहे. यावर नियंत्रण आणणे हे पोलीस यंत्रणेचेच काम आहे. लॉकडाऊन उठले असले तरी कोरोनाचा समुहसंसर्ग वाढू नये याकरीता पोलीस यंत्रणेने दक्ष व सतर्क रहाणे आवश्यक आहे त्यानुसार आपल्या पोलिस यंत्रणेकडून नियोजन करावे.असे सांगत ते म्हणाले कोरोना काळात पोलीस बंदोबस्तांत असणाऱ्या आपल्या विभागाच्या काही पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण होवून त्यांचा मृत्यू झाला आहे ही दुर्देवी बाब आहे.आपण सेवा बजावित असताना आपली काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव अजुनही कमी झाला नाही त्यामुळे लॉकडाऊन नसले तरी पोलीस बंदोबस्तात असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबिंयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहून सेवा बजावावी याकरीता प्रत्येकाला सुचित करण्यात यावे असे ना.शंभूराज देसाईंनी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना सांगितले.

कोरोनाचा मुकाबला करण्याकरीता जिल्हा नियोजन विभागाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजनचा निधी वापरण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत.आपल्या पोलिस विभागाला यातील काही निधीची आवश्यकता असल्यास तसा प्रस्ताव या पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांनी संबधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना दयावा मी स्वत: या पाचही जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करुन आपले विभागाला आवश्यक निधी मिळवून देण्याकरीता प्रयत्नशील असल्याचेही ना.देसाईंनी योवळी बैठकीत सांगितले.यावेळी सातारा पोलिस विभागामार्फत पोलीस यंत्रणेकरीता उभारण्यात येणाऱ्या कोरोना सेंटरच्या कामांचाही त्यांनी यावेळी बैठकीत आढावा घेतला. या सेटंरमध्ये ६० टक्के पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यास उपचार करण्यात येणार आहेत तर ४० टक्के सर्वसामान्य नागरिकांना कोरोना सेंटरमध्ये उपचार देण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी ना.देसाईंना दिली.

कोरोना योध्दा म्हणून कार्यरत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

गत सहा महिन्यांपासून राज्यातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरुन कोरोनाचा जनमानसात प्रार्दुभाव वाढू नये याकरीता आवश्यक त्या सर्व यंत्रणांचा वापर करीत कोरोना योध्दा म्हणून स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता कार्यरत आहे. ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोना काळातील पोलीसांच्या कार्याचे कौतुक केले व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!