फलटण मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष खुल्या गटात मांढरदेवचे बाळू पोकळे प्रथम तर महिला गटात माणदेशी फाऊंडेशनच्या आरती बाबर प्रथम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ मे २०२३ | फलटण |
फलटण मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष खुल्या गटात मांढरदेवचे बाळू पोकळे प्रथम तर महिला गटात माणदेशी फाऊंडेशनच्या आरती बाबर प्रथम आली. ही स्पर्धा शेकडो स्पर्धकांच्या सहभागाने उत्साहात संपन्न झाली.

यावेळी सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजगुरू कोचळे सर म्हणाले की, श्रीमंत संजीवराजे यांनी फलटणमध्ये क्रीडा चळवळ सुरू केली आहे, ती कौतुकास्पद आहे. फलटणमध्ये खो-खो, हॉकी क्रीडा प्रकार जास्त चालतात. अ‍ॅथलेटिक्स खेळ फलटण तालुक्यात मागे पडला होता; परंतु बाबांनी लक्ष घालून अ‍ॅथलेटिक्स खेळाला पुढे आणले आहे. त्यामुळे फलटणला अ‍ॅथलेटिक्स व रनिंग मूव्हमेंट सुरू झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे ही फलटण मॅरेथॉन स्पर्धा आहे. आयोजन समितीने चांगल्या प्रकारे स्पर्धेचे नियोजन केले आहे. स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धकांनी चांगल्या पद्धतीने स्पर्धा पूर्ण करायची आहे व स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, असे प्रतिपादन करून सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजगुरू कोचळे सर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती, फलटण यांच्यातर्फे मुधोजी क्लब फलटण येथे मंगळवार, दि. २ मे २०२३ रोजी ‘फलटण मॅरेथॉन २०२३’चे आयोजन केले होते. स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजगुरू कोचळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी कोचळे सर बोलत होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, सदस्य शिरीष वेलणकर, महादेव माने, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बी.एम. गंगवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागात मॅरेथॉन स्पर्धा व्हाव्यात व त्याचा लाभ ग्रामीण खेळाडूंना मिळावा, त्यातून चांगले खेळाडू तयार व्हावेत, या उद्देशाने फलटण येथे तालुक्याच्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये फलटणमध्ये फूल व हाफ मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. त्यादृष्टीने आत्तापासूनच खेळाडूंनी सराव सुरू करावा, असे आवाहन करून सहभागी स्पर्धकांना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या.

फलटण मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे.
खुला गट पुरुष – १० कि.मी. विजेते – प्रथम क्रमांक बाळू पोकळे (मांढरदेव), द्वितीय क्रमांक आदित्य चव्हाण, तृतीय क्रमांक शिवराज इंगळे.

खुला गट महिला – ८ कि.मी.विजेते – प्रथम क्रमांक आरती बाबर (माणदेश फाउंडेशन), द्वितीय क्रमांक अल्मास मुलानी, तृतीय क्रमांक प्रतीक्षा शिंदे.

४५ वर्षापुढील पुरुष – ३ कि. मी. विजेते – प्रथम क्रमांक प्रशांत जाधव, द्वितीय क्रमांक दत्तात्रय कदम, तृतीय क्रमांक सुनील गवळी.

४५ वर्षापुढील महिला – २ कि. मी. विजेते – प्रथम क्रमांक संगीता उबाळे, द्वितीय क्रमांक इंदुमती गायकवाड, तृतीय क्रमांक उज्वला बोडरे.

१८ वर्षे आतील मुले – ५ कि. मी. विजेते – प्रथम क्रमांक मोहित जगताप, द्वितीय क्रमांक शुभम माने, तृतीय क्रमांक नवनाथ दडस.

१८ वर्षे आतील मुले – ३ कि. मी. विजेते – प्रथम क्रमांक शिवानी नरळे, द्वितीय क्रमांक चैताली चव्हाण, तृतीय क्रमांक प्रणोती कुचेकर.

फलटण मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण केलेल्या ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीच्या वतीने ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जयश्री फणसे, भिमदेव बुरुंगले, अविनाश जगताप, प्रभावती कदम, रामचंद्र घोरपडे, महेंद्र आरगे, अशोक फडतरे, हिराचंद गोरे यांचा सहभाग होता.

मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मोहिते सर व रूपचंद बोबडे सर यांनी केले तर आभार फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ सर यांनी मानले.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!