सासकलचे शेतकरी बबन मुळीक यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार

फलटण तालुक्यातील सासकल येथील प्रगतशील शेतकरी बबन मुळीक यांना फळबाग लागवडीतील योगदानाबद्दल राज्य शासनाचा ‘उद्यान पंडित’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २ जुलै : कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबईत आयोजित सोहळ्यात फलटण तालुक्यातील सासकल येथील प्रगतशील शेतकरी बबन मुळीक यांना राज्यपालांच्या हस्ते प्रतिष्ठेचा ‘उद्यान पंडित’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फळबाग लागवडीत आधुनिकतेचा वापर

बबन मुळीक यांनी सासकल येथील माळरानावर जिद्दीने डाळिंब, सीताफळ आणि अ‍ॅव्होकॅडो यांसारख्या फळबागा फुलवल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान आणि १०० टक्के ठिबक सिंचनाचा वापर करून ते यशस्वी उत्पादन घेत आहेत. रोजगार हमी योजनेतून राज्यात पहिल्यांदाच अ‍ॅव्होकॅडोची लागवड करण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे.

सेंद्रिय शेतीवर भर

फळबागांसाठी ते पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करतात. गांडूळ खत, दशपर्णी अर्क, जीवामृत आणि व्हर्मिवॉश निर्मितीसाठी त्यांनी स्वतःचे युनिट उभारले आहे. उत्पादित फळांची थेट ग्राहकांना विक्री करून त्यांनी शेती व्यवसायात आदर्श निर्माण केला आहे. या यशात पत्नी संगीता, मुले अजिंक्य आणि निखिल तसेच कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मुळीक यांनी स्पष्ट केले.

दिग्गजांच्या उपस्थितीत सन्मान

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्ता भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुळीक यांच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Back to top button
Don`t copy text!