
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यात आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ११ महिन्यांत ११ लाखांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार झाले असून शासनाने २,८६९ कोटी खर्च केले आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. २५ नोव्हेंबर : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी राज्य शासनामार्फत ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रितपणे राबविण्यात येत आहेत. या दोन्ही योजनांतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील ११ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी १७ लाखांहून अधिक उपचारांचा लाभ घेतला आहे. शासनाने या उपचारांसाठी २ हजार ८६९ कोटी ४५ लाख रुपये खर्च केले आहेत.
५ हजारांहून अधिक रुग्णालयांत २,३९९ उपचारांची सुविधा
शासनाच्या निर्णयानुसार पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांसह राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबे या एकत्रित योजनेअंतर्गत प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांसाठी पात्र आहेत. राज्यातील पाच हजारांहून अधिक शासकीय, महानगरपालिका आणि अंगीकृत खासगी रुग्णालयांमध्ये २ हजार ३९९ प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचार पद्धती उपलब्ध आहेत. यामध्ये कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, न्यूरोसर्जरी आणि अपघाती दुखापतींचा समावेश आहे. तसेच हृदय, फुफ्फुस, यकृत प्रत्यारोपणासह नऊ दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी कॉर्पस निधीतून ९.५ लाख ते २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
४.४५ कोटी आयुष्मान कार्ड व ज्येष्ठांसाठी ‘वय वंदना’ कवच
राज्यात आतापर्यंत ४ कोटी ४५ लाख लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड आणि १२ लाख २० हजार ज्येष्ठ नागरिकांचे ‘वय वंदना’ कार्ड तयार करण्यात आले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ७० लाख ८८ हजार ६९१ आयुष्मान कार्ड आणि ६ लाख ६ हजार ८५५ वय वंदना कार्ड तयार झाली असून २५ लाख ४२ हजार ५४४ कार्डांचे वितरण पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेंतर्गत ७० वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण मिळत आहे. अद्ययावत शिधापत्रिका आणि आधार क्रमांकाच्या मदतीने आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रे किंवा आयुष्मान ॲपद्वारे नागरिक स्वतःचे कार्ड तयार करू शकतात.



