जागतिक कावीळ दिनानिमित्त साताऱ्यात जनजागृती रॅली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२३ । सातारा । जागतिक कावीळ दिनानिमित्त दि. 28 जुलै 2023 रोजी जिल्हा रुग्णालय, सातारा येथे राष्ट्रीय विषाणूजन्य कावीळ नियंत्रण कार्यक्रम विभागाच्या वतीने कावीळ जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा शुभारंभ कार्यक्रम जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांचे मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा, डॉ. सुभाष कदम, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक सातारा, डॉ. राहूल जाधव अति. जिल्हा शल्यचिकित्सक सातारा, डॉ. रश्मी कुलकर्णी, नोडल अधिकारी कावीळ नियंत्रण कार्यक्रम तथा निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर हिरास, अधिसेविका जिल्हा रुग्णालय सातारा सरला पुंड, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय साताराचे डॉ.अभिजीत निंघोट व डॉ. रोहीत हेरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कुलकर्णी प्रास्ताविकात म्हणाल्या या वर्षीचे जागतिक कावीळ दिनाचे घोषवाक्य हातात हात मिळवूया, कावीळीवर मात करुया, समन्वय व  विकेंद्रीकरणातून प्रतिसाद वाढवूयात, असे आहे याबाबत माहीती दिली.   डॉ.जाधव आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, कावीळ हा आजार गंभीर स्वरुपाचा आहे व त्यासाठी समाजातील सर्व लोकांनी त्याची माहिती करुन घेतली पाहिजे. योग्यरित्या आपण औषधोपचार घेतला तर कावीळ आजार पुर्णपणे बरा होतो. परंतु तो होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचारींसह समाजातील लोकांनी योग्य ती काळजी घेऊन तो टाळावा, असे आवाहन केले.

डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय कावीळ नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दीष्ट सांगितले व कावीळ आजाराची लक्षणे, चाचणी व त्या वरील उपचार या बाबत मार्गदर्शन करुन सर्वांनी कावीळ लस घ्यावी, असे आवाहन केले.

यानंतर मान्यवरांनी  हिरवा झेंडा दाखवून रॅलीला मार्गस्थ केले. रॅलीमध्ये नर्सिंग 200 युवक व युवतींसह विविध सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!