स्थैर्य, दि. ७: गेल्या काही वर्षांपासून स्त्री-मुक्ती किंवा महिला सबलीकरण हे विषय चर्चेत आहेत. ‘महिलांचे सबलीकरण’ हा विषय बहुतांश वेळा आधुनिकीकरण किंवा पाश्चात्त्य अन संस्कृतीविरोधी विचारसरणीच्या प्रभावाने चर्चिला जातो. ‘अमर्यादित स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती’ अशी अयोग्य संकल्पना तथाकथित पुरोगामी आणि संस्कृतीविरोधक यांच्याकडून ठसवण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आज अनेक महिला, युवती अयोग्य वाटेवर चालल्या आहेत. त्यांना खऱ्या उन्नतीच्या मार्गावर आणायचे असेल, तर अयोग्य संकल्पनांचे जोखड उतरवून टाकून त्यांना योग्य दिशा द्यावी लागेल. ही दिशा संस्कृतीचे अनुसरण आणि धर्माचरण करण्याच्या संदर्भात आहे; कारण साधना करून मिळणारे आत्मतेजच व्यक्तीच्या व्यावहारिक आणि पारलौकिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करते.
हिंदु धर्मात महिलांचे स्थान
‘भारतीय संस्कृतीत महिलांवर अनेक बंधने होती. अलीकडच्या काळात विशेषतः त्यांना शिक्षण मिळू लागल्यावर महिलांना अनेक अधिकार प्राप्त झाले’, असा अपप्रचार अनेक जणांकडून केला जातो; पण अभ्यास केल्यावर वस्तुस्थिती वेगळी असल्याचे लक्षात येते. भारतीय संस्कृतीने किंवा सनातन हिंदु धर्माने कोणावरची अन्याय करण्याची कधीही शिकवण दिली नाही, उलट कायम ‘वसुधैव कुटुम्बकम’ किंवा ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु’ अशी प्रार्थना केली आहे. मनुस्मृतीमध्ये ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ म्हणजे ज्या ठिकाणी नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात, असे म्हटले आहे. हिंदु धर्माने महिलांना कधीही अन्य पंथांप्रमाणे उपभोग्य वस्तू मानले नाही कि राक्षस मानले नाही. उलट हिंदु धर्माने स्त्रीला आदिमाया शक्तीचे रूप मानले आहे. विवाहानंतर कोणतीही पूजा पत्नीच्या सहभागाविना पूर्ण होत नाही. हिंदु धर्मामध्ये देवतांची नावेही लक्ष्मी-नारायण, सीता-राम, राधे-श्याम, गौरी-शंकर अशा प्रकारची आहेत. जेथे स्त्रियांना पुरुषांपेक्षाही उंच स्थान दिले आहे, तेथे स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणे म्हणजे स्त्रियांचे अवमूल्यन करण्यासारखे आहे. महिलांसाठी एक दिवस नाही, तर प्रत्येक दिवसच हिंदु धर्माने दिला आहे. देवतांची नावे उच्चारतानाही प्रथम देवींना वंदन करणारा धर्म अन्यायकारक आहे, असे म्हणणे हा निवळ हिंदुद्वेष आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
विद्वान, शूर आणि कर्त्या महिला
भारतीय संस्कृतीत अनेक विद्वान, पराक्रमी, कुशल महिला होऊन गेल्या. महाभारतीय युद्धात काश्मीर राजा ठार झाल्यानंतर त्याची पत्नी यशोमती हिचा राज्याभिषेक स्वतः भगवान श्रीकृष्णाने केला होता. अर्जुनाची एक पत्नी चित्रांगदा मणिपूर राज्याची राणी होती. राम वनवासात निघाले, तेव्हा राजगुरु वसिष्ठ ऋषींनी सीता राज्यकारभार करण्यास कुशल आणि सक्षम असल्याने तिचाच राज्याभिषेक करावा, असे सुचवले होते; मात्र सीतेने रामासह वनवासात जाण्याची अनुज्ञा मागितल्याने तिने राज्यकारभार केला नाही, असा उल्लेख वाल्मीकि रामायणात आहे. तात्पर्य हिंदु धर्माने कधीही स्त्रीला कर्तेपणापासून रोखलेले नाही. पुराणांमध्ये अनेक विदुषींचे उल्लेख आढळतात. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा आदी विदुषी वेद-शास्त्रामध्ये पारंगत होत्या. माता कैकेयीचे वर्तन कसेही असले, तरी दशरथ राजासह कैकेयेही युद्धात शस्त्र हाती धरून लढाई करत असल्याचे वर्णन आहे. अलीकडच्या काळातील उदाहरण पाहायचे म्हटले, तर राणी लक्ष्मीबाई या युद्धशास्त्रात पारंगत होत्या. देशप्रेमाने ओतप्रोत असल्यानेच चिमुकल्या बाळाला पाठीला बांधून त्या युद्ध लढायला गेल्या. शहाजीराजे कर्नाटकमध्ये असतांना राजमाता जिजाई यांनी पुणे जहागिरीचा राज्यकारभार सांभाळला. छत्रपती राजारामाची पत्नी राणी ताराबाई यांनी कर्त्या होऊन कोल्हापूर संस्थान स्थापन केले होते. अहल्याबाई होळकर पतीनिधनानंतर होळकर घराण्याच्या कर्त्या झाल्या होत्या. थोडक्यात शूर-वीर, विद्वान महिलांची परंपरा भारताला लाभली आहे.
या परंपरेचे पाईक व्हायचे असेल, तर आपल्यातील गुणांचा विकास करून त्रुटींवर आणि न्यूनगंडावर मात केली पाहिजे. ‘तोकडे किंवा पाश्चात्त्य कपडे म्हणजे आधुनिकपणा’, ‘इंग्रजी बोलणे म्हणजे पुढारलेपण’ अशा अंधश्रद्धा झटकून टाकल्या पाहिजेत. स्वैराचारासारख्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांमध्ये भेद आहे. तो समजून घ्यायला हवा. कुटुंबव्यवस्था हे भारताचे बलस्थान आहे. स्त्री ही कुटुंबव्यवस्थेचा कणा आहे. हा कणा जेवढा कणखर असेल, तेवढी कुटुंबव्यवस्था सुदृढ राहील. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनी अधिक प्रमाणात केली आहे. आज जगभरातील लोकही ‘बॅक तो मदरहूड’ म्हणत कुटुंबव्यवस्था जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणही शालीनता, सुसंस्कृतपणा टिकवून ठेवण्याचे संस्कार केले पाहिजेत.
असुरक्षित महिला
आज देशाच्या परिस्थितीचा विचार केला, तर महिला असुरक्षित आहेत. ज्या देशात एका महिलेच्या शीलरक्षणाच्या सूत्रावरून रामायण, महाभारत घडले, त्या देशात आज प्रतिदिन शेकडो महिला अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो’च्या आकडेवारीनुसार वर्ष 2019 मध्ये भारतात महिलांवरील हिंसाचाराच्या संदर्भात 4.05 लाख घटनांची नोंद झाली. यातील ३० टक्के घटना या घरगुती हिंसाचाराच्या आहेत, तर ८ टक्के घटना बलात्काराच्या आहेत.’ऑक्सफेम’ या जागतिक विश्लेषण संस्थेने भारतात प्रत्येक 15 मिनिटाला एका मुलीवर बलात्कार होत असल्याचे म्हटले आहे. देशात वर्ष 2018 मध्ये बलात्काराच्या 34 सहस्र घटनांची नोंद झाली. 85 टक्के प्रकरणात आरोप निश्चित झाले; पण शिक्षा केवळ 27 टक्के लोकांना होऊ शकली, असे या अहवालात म्हटले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी अनेक हिंदु युवती आज ‘लव्ह जिहाद’ची शिकार होत आहेत.
रामराज्यामध्ये महिला मध्यरात्रीची दागिने घालून एकटी जाऊ शकत असे. आज तशी स्थिती नाही; कारण आज रामराज्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजच्या काळातही महिलांकडे वाकड्या दृष्टीने पाहणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला हात-पाय तोडले जाण्याची शिक्षा मिळाली होती. आज त्वरित शिक्षा होणे तर दूरच; पण पीडित महिलेची तक्रारही सहजासहजी नोंदवली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. केवळ कठोर कायदे करून ही स्थिती पालटली जाणार नाही, तर त्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न व्हावे लागतील.
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सक्षमता
महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवायचे असेल, तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा ३ स्तरांवर उपाय करावे लागतील. प्रसिद्धीच्या स्टंटपायी गाभाऱ्यात घुसल्याने महिलांचे सक्षमीकरण होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. महिलांना शारीरिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर त्यासाठी प्रयत्न होऊ शकतात; पण केवळ शारीरिक सक्षमता पुरेशी नाही. प्रसंगांना सामोरे जाण्याचे मनोबल आणि आत्मबल आवश्यक असते. हे बळ साधना आणि धर्माचरण याद्वारेच प्राप्त होऊ शकते. आज अनेक जणी, अगदी विवाहित महिलाही कपाळावर लाल गोल कुंकू लावायची लाज बाळगतात. आधुनिकतेच्या नावाखाली पारंपरिक भारतीय पेहराव सोडून तोकडे कपडे घालतात. अशा प्रकारे उच्छृंखल वागण्याने मनोबल आणि आत्मबल प्राप्त होऊ शकणार नाही, तर हे बळ मिळवण्यासाठी साधनाच करावी लागेल. भक्ती आणि साधनेचे बळ असल्यानेच संत मीराबाई यांच्यावर जीवघेणी संकटे ओढवली, तरी श्रीकृष्णाने त्यांचे अद्भुतरित्या रक्षण केले. भक्तीमध्येच शक्ती आहे, हे लक्षात घेऊन आपली भावभक्ती वाढवायला हवी. कोरोनाच्या महामारीनंतर आज जग मोठ्या आशेने हिंदु धर्माकडे पाहत आहे. हिंदु आचार आत्मसात करत आहे. आपणही अभिमानाने धर्माचरण करून धर्मशक्तीची प्रचिती घ्यायला हवी. ‘साधनेद्वारे आत्मतेज जागवणे’, हे खरे सबलीकरण आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
संकलक – श्रीमती अलका व्हनमारे, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा
संपर्क : 8805367562