स्थैर्य, सातारा, दि. २६ : गेल्या पाच महिन्यांपासून सातारा जिल्हा पोलीस दलातील प्रत्येक पोलीस करोनाला थोपविण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहे. ही वस्तुस्थिती असताना जिल्हा रुग्णालयात कामानिमित्त जाणार्या सातारा येथील एका पोलिसाच्या कुटुंबातील सदस्यांना परिसरातील नागरिक हीन वागणूक देत असल्याची घटना समोर येत आहे. संबंधित पोलीस वारंवार जिल्हा रुग्णालयात जात असल्याने त्याच्यामुळे अथवा त्याच्या कुटुंबीयांमुळे आपणाला कोरोनाची बाधा होऊ शकते. केवळ या भीतीपोटीच काही नागरिक त्याच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न करत असल्याने तीन महिन्यांपूर्वीच पोलीस आणि आरोग्य सेवकांसाठी वाजवलेल्या टाळ्या, केलेला घंटानाद हे सारे ढोंग होते का? सातारकरांची माणुसकी झिरपली की काय असा संतप्त सवाल पोलिसाच्या पत्नीने उपस्थित केल्यामुळे पोलिसांप्रती बेगडी प्रेम दाखविणार्यांचे पितळ आता उघडे पडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मार्च 2020 मध्ये शेवटच्या आठवड्यात करोना ने खंबाटकीचा घाट ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. अनुमानित व्यक्तींची संख्या वाढू लागल्यामुळे 22 मार्च 2020 पासून सातारा जिल्ह्यात जारी करण्यात आलेला लॉकडाउन 1 जून 2020 रोजी अंशत: करण्यात आला. महिनाभरात सातारा जिल्ह्यातील करोना ची परिस्थिती सुधारत असताना अचानक सातारा शहर व जिल्ह्यात करोना अनुमानित आणि बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. जुलै 2020 या महिन्यात सातारा जिल्हा रुग्णालयातील जवळपास सर्वच वॉर्ड कोरोना सेंटर समजले जाऊ लागले. बाधित रुग्णांची संख्या, बाधित झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. दरम्यानच्या काळात सातारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणार्या एका पोलिसाला कामकाजानिमित्त सातत्याने जिल्हा रुग्णालयात जावे लागत असे. ते सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका कॉलनीमध्ये पत्नी व तीन मुलांसह वास्तव्य करतात. जिल्हा रुग्णालयात करोना अनुमानित आणि बाधित व्यक्ती मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या आसपास वास्तव्य करत असणार्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अनाठायी भीती निर्माण झाली आहे. संबंधित पोलीस कर्मचार्यामुळे अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांमुळे आपणाला कोरोनाची बाधा तर होणार नाही ना हा भ्रमाचा भोपळा त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. परिणामी तो पोलीस वास्तव्य करत असलेल्या घराच्या आसपास असणार्या कुटुंबातील सदस्यांनी त्या पोलिसाच्या पत्नीशी, मुलांशी तुसडेपणाने वागण्यास सुरुवात केली आहे. संबंधित पोलीस पत्नीशी शेजारील एखाद्या कुटुंबातील एखादी महिला बोलली तरी त्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख बोलणार्या महिलेचा पाणउतारा करत आहेत. गेले काही दिवस हा प्रकार सुरू झाल्यामुळे त्या पोलीस पत्नीने आपल्या मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. अशा घटनांमुळे तिची घुसमट होऊ लागली असून त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवरही होऊ लागला आहे. आपली आई आपल्याला घराबाहेर का जाऊ देत नाही, हे त्यांच्या लक्षात येत असल्यामुळे त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम होत आहे.
माझे पती बारा-बारा तास पोलीस चौकीत काम करतात. मलाच नव्हे तर माझ्या मुलांनाही त्यांचा अभिमान वाटतो. जनतेची सेवा करणे, त्यांचा अमूल्य जीव वाचवणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे प्रत्येक पोलिसाचे काम आहे. तेच काम माझे पती करत आहेत. आज माझ्या सभोवताली निर्माण झालेले वातावरण पाहता माझ्या पतीलाही कोरोना होईल ही भीती वाटण्यापेक्षा शेजारील लोकांची मला भीती वाटते. समाजातील काही मोजकेच घटक अनाठायी भीती बाळगून कोरोना कशाने होतो, याबाबत आजही मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत त्या पोलिसाच्या पत्नीने व्यक्त केले.
पोलीस दलात तक्रार प्राप्त होईपर्यंत पुढे कोणतीच कारवाई केली जात नाही. इथे तर स्वतः पोलिसाच्या कुटुंबावरच अन्याय झाला असल्याचे प्रथम सकृतदर्शनी दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या नेहमीच पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत असल्याचे अनेक दाखले देता येतील. पोलीस दलातील कुटुंबप्रमुख म्हणून सातपुते या घटनेकडे कशा पाहतात? या घटनेबाबत त्यांची भूमिका काय राहील, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्हा रुग्णालयात काम करणारे काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनाही अशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात नोकरी करतो या एकाच कारणामुळे अनेकांना भाड्याचे घर खाली करण्यास सांगण्यात आले आहे. काहींना घर खाली करण्यास भाग पाडण्यात आले. रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की ड्यूटीवरून घरी गेल्यानंतर परिसरात राहणारे नागरिक संशयितपणे आमच्याकडे कटाक्ष टाकतात. त्यांची नजर पाहिल्यानंतर क्षणभर जगावे की मरावे हेच कळत नाही.