शेरेवाडीच्या युवकाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी सतर्कतेने घेतले ताब्यात


दैनिक स्थैर्य । दि.१९ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथे बांधलेला गोठा पाडण्यात आल्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून देखील न्याय मिळत नसल्याने सचिन वामन स्वामी या युवकाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वतःवर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.

शेरेवाडीतील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तंटामुक्ती अध्यक्ष तसेच माने कुटुबियांच्या अन्यायाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा प्रयत्न हाणून पाडल्याने पुढील अनर्थ टळला. आत्मदहनाबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा तयार ठेण्यात आली होती.

शेरेवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि माने कुटुंबियांकडून अन्याय होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना यापूर्वी देण्यात आले होते. मात्र, न्याय मिळत नसल्याने मागील 15 दिवसांपुर्वी त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांना आत्मदहनाबाबत निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली होती.
त्यांच्या मिळकत नंबर 163 मधील गुरांच्या गोठय़ाची डागडुजी चालू असताना तंटामुक्ती अध्यक्ष अनंत गवाणे, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि माने कुटुंबीयांनी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत दमदाटी करून शेडचे दुरुस्ती काम बंद पाडत शेडच्या 6 पोलचे नुकसान केले होते. यावेळी संबंधितांविरुद्ध कारवाई झाली नव्हती. संबंधितांकडुन वारंवार होणाऱया अन्यायाला कंटाळून स्वामी यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे म्हणणे आहे.


Back to top button
Don`t copy text!