अशोक लवासा यांचा राजीनामा


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. १८ : बिहार निवडणुकांपूर्वी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु लवासा यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रपतींकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते आशियाई विकास बँकेत उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आशियाई विकास बँकेत ते दिवाकर गुप्ता यांची जागा घेतील. जानेवारी २०१८ मध्ये लवासा यांनी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या इतिहासात आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे लवासा हे दुसरे आयुक्त ठरले आहेत. अशोक लवासा यांच्यापूर्वी १९७३ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त नागेंद्र सिंग यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. दरम्यान, अशोक लवासा यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना एप्रिल २०२१ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तपदी बढती मिळाली असती.

लवासा यांनी ऑस्ट्रेलियातून आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर मद्रार विद्यापीठातून डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये आपलं एमफील पूर्ण केलं आहे. तसंच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी ऑनर्स आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. अशोक लवासा यांनी यापूर्वी केंद्रीय वित्त सचिव, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयात सचिव आणि नागरी उड्डाण मंत्रालयात सचिवपदासहित अनेक वरिष्ठ पदांवर सेवा बजावली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!